कुडाळ | प्रतिनिधी
शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हीएशन एम्प्लॉईज युनियनच्या कार्याध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना नेते काका कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील द हिल्टन हॉटेल येथे झालेल्या युनियनच्या सर्वसाधारण सभेत उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या सभेला खासदार रवींद्र वायकर, आमदार दिलीप लांडे, आमदार प्रकाश सुर्वे, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे राज्यप्रमुख मंगेश चिवटे, युनियनचे जनरल सेक्रेटरी कुणाल सरमळकर यांच्यासह विविध पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संघटनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये काका कुडाळकर यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांच्याकडे गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ येथील युनियनच्या कामकाजाचीही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.
सभेत उपस्थित मान्यवरांनी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी युनियनने केलेल्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही संघटनेला भक्कम पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. यावेळी शिवसेनेचे युवा नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधत पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन केले आणि संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
युनियनचे जनरल सेक्रेटरी कुणाल सरमळकर यांनी संघटनेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या एका वर्षात युनियनचे सदस्यत्व पाच हजारांहून अधिक झाल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात देशातील सर्व विमानतळांवर शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हीएशन एम्प्लॉईज युनियनचे संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.


