Wednesday, September 2, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ पंचायत समितीच्या माध्यमातून महालक्ष्मी हॉल येथे तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शन व पाककृती...

कुडाळ पंचायत समितीच्या माध्यमातून महालक्ष्मी हॉल येथे तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शन व पाककृती महोत्सवाचे दिमाखात आयोजन..

कुडाळ | प्रतिनिधी 

         रासायनिक खतांचा वापर करून पिकवलेल्या भाज्यांच्या काळात निसर्गाचा अनमोल ठेवा असलेल्या रानभाज्यांचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुडाळ पंचायत समितीच्या माध्यमातून महालक्ष्मी हॉल येथे तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शन व पाककृती महोत्सवाचे दिमाखात आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात तब्बल ५१ प्रकारच्या ताज्या (लाईव्ह) रानभाज्या आणि १५० हून अधिक चविष्ट पाककृतींचे स्टॉल्स मांडण्यात आले होते.

      या कार्यक्रमास जि. प. उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल,कुडाळ सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली, जि. प. सदस्य आरती पाटील, सुप्रिया वालावलकर, रुपेश कानडे, नागेश आईर, माजी जि. प. अध्यक्ष काका कुडाळकर, पं. स. सदस्य भाऊ प्रभू, बाळकृष्ण मडव, प्रफुल्ल वालावलकर, गटविकास अधिकारी श्री. निवेकर, सरपंच संघटना अध्यक्ष राजन परब, गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, श्रीमती कार्लेकर, निखिल कांदळगावकर, सौ. जळवी, सौ. सावंत, सौ. तेरसे, सौ. पावसकर, सौ. खरात यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने’अंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.यावेळी जि. प. उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आपल्या भाषणात ऋतुमानानुसार मिळणाऱ्या भाज्यांचे आणि परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. “पूर्वीचे आपले पूर्वज निसर्गाच्या चक्रानुसार आहाराचे नियोजन करत असल्याने १०० हून अधिक वर्षे निरोगी आयुष्य जगत होते. आजच्या आधुनिक काळातही आपल्याला निरोगी पिढी घडवण्यासाठी रानभाज्यांकडे वळावे लागेल,असे ते म्हणाले. महिलांनी तयार केलेल्या अळूच्या देठांच्या कुरकुरीत कापांचे आणि विविध पाककृतींचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच रानभाज्यांचे केवळ प्रदर्शन न होता त्यांचे संवर्धन आणि व्यावसायिक उत्पादन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

      सभापती मिलिंद नाईक यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत लाजरीची भाजी आणि अळूच्या दुर्मिळ भाज्यांचे आरोग्यदायी फायदे सांगितले.रासायनिक भाज्यांपेक्षा रानभाज्या शरीरासाठी अत्यंत पोषक असून, प्रत्येकाने दैनंदिन आहारात त्यांचा समावेश करावा, असा सल्ला त्यांनी दिला. हा संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.जि. प. सदस्य रुपेश कानडे यांनी प्रदर्शनातील भाज्या पूर्णपणे रासायनिक खतांविरहित व आरोग्यदायी असल्याचे सांगत कार्यक्रमाचे कौतुक केले.यावेळी आरती पाटील, काका कुडाळकर यांनी आपले मनोग व्यक्त केले.

         स्थानिक महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि रानभाज्यांच्या पाककृतींना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक रू.७,०००, द्वितीय क्रमांक रू.५,०००, तृतीय क्रमांक रू.३,००० आणि ५ जणींना प्रत्येकी रु.१,००० ची उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.मंत्रालयातील महत्त्वाच्या बैठकीमुळे उपस्थित राहू न शकलेले आमदार निलेश राणे यांनी दूरध्वनीवरून या महोत्सवाला आणि सहभागी महिलांना विशेष शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसभापती सीताराम तेली यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!