कुडाळ | प्रतिनिधी
माणगाव धरणवाडी येथील धारगळकर कुटुंबीयांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून सुमारे ६ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला. दिवसाढवळ्या काही कालावधीत झालेल्या या चोरीमुळे माणगाव खोऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.
या चोरी प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात रुपेश धारगळकर यांनी खबर दिली की, ते कुटुंबासहित माणगाव धरणवाडी येथे राहतात. आठ दिवसापूर्वी त्यांचे आई-वडिल हे मुंबई येथे गेले आहेत. सध्या रुपेश व त्यांचा लहान भाऊ निलेश असे दोघेच घरी राहत होते. दरम्यान बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रुपेश त्यांच्या आतेचे ऑपरेशन झाल्याने तिला पाहण्यासाठी सावंतवाडी येथे गेले होते. तर भाऊ निलेश सावंतवाडी येथे एका महाविद्यालय शिक्षक असल्याने तो नेहमीप्रमाणे ११ वाजता घराला कुलूप लावून सावंतवाडीला गेला होता.
या दरम्यान सावंतवाडी वरून दुपारी हे दीड वाजण्याच्या सुमारास घरी आले असता त्यांनी त्यांच्याकडून चावीने दरवाजाचे कुलूप उघडून घरात गेले असता बेडरूम मधील कपाटाचा दरवाजा उघडा दिसला व कपाटातील कपडे व साहित्य बेडवर टाकलेले दिसले. याचप्रमाणे त्यांच्या आईच्या बेडरूम मधीलही साहित्य कपडे बेडवर असता वस्तू टाकलेले होते. तसेच कपडे ठेवण्याची पत्र्याची पेटी यातील सामान काढून बाहेर टाकलेले होते. तसेच भावाच्या रूम मध्ये ही कपाटातील साहित्य व सामान बेडवर टाकलेले होते. तर पाठीमागील बाजूच्या पडवीच्या दरवाजाची कडी व किचन रूम दरवाजाची कडी तुटलेली होती. त्यामुळे चोरीचा संशय आल्याने या बाबत रूपेश यांनी त्याने पोलिसांना कळविले.
या प्रकरणी घटनास्थळी कुडाळ पोलिसांनी तात्काळ जात पंचनामा व तपास सुरू केला असता अज्ञात चोरट्याने धारगडकर कुटुंबीयांच्या घरातील १ लाख २० हजार किमतीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ६० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचा सोन्याचा हार, सुमारे १ लाख २० हजार किमतीचे चार तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, सुमारे ६० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वाजण्याच्या तीन अंगठ्या व सुमारे ३ लाख रुपये रोख रक्कम असा मिळून सुमारे ६ लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची निदर्शनास आले आहे.
या चोरी प्रकरणी कुडाळ पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञ ही यांनाही यांच्यामार्फत ही तपासणी करण्यात आली आहे. या चोरीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे हे करीत आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या या धाडसी चोरीमुळे मात्र माणगाव खोऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.
