Saturday, August 22, 2026
Google search engine
Homeआपलं कोंकण“कोकणच्या रानभाज्या आता जगाच्या ताटात! इन्सुली महोत्सवाने दाखवली महिला उद्योजकतेची नवी वाट!”

“कोकणच्या रानभाज्या आता जगाच्या ताटात! इन्सुली महोत्सवाने दाखवली महिला उद्योजकतेची नवी वाट!”

सौ. वेदिकाताई परब यांचा महाराष्ट्रासह देशभर उपक्रम नेण्याचा संकल्प. – युवा नेते विशाल परब यांचा ‘ग्लोबल मार्केट’चा विश्वास.

विक्रमी प्रतिसादाने रानभाज्या महोत्सव गाजला !

सावंतवाडी :

कोकणच्या लाल मातीत, डोंगरदऱ्यांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सान्निध्यात उगवणाऱ्या असंख्य रानभाज्यांना आता स्थानिक चुलीपासून देश-विदेशातील बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याची नवी दिशा मिळताना दिसत आहे. पारंपरिक खाद्यसंस्कृती, रानभाज्यांचे औषधी गुणधर्म आणि कोकणातील महिलांच्या पाककलेचा अनोखा संगम असलेल्या इन्सुली येथील रानभाज्या महोत्सवाला उत्स्फूर्त आणि विक्रमी प्रतिसाद मिळाला.

महोत्सवात शेकडो प्रकारच्या रानभाज्या तसेच विविध पारंपरिक पाककृतींचे दर्शन घडले. महिलांनी आपल्या पारंपरिक पाककौशल्यातून साकारलेल्या विविध पदार्थांनी उपस्थितांची मने जिंकली. या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला आर्थिक आणि व्यावसायिक संधी मिळण्याची नवी वाटही खुली झाली आहे.

 

‘इन्सुलीपुरता हा उत्सव मर्यादित राहणार नाही’ – वेदिका परब

युवा सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका विशाल परब यांनी महोत्सवाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत हा उपक्रम भविष्यात सावंतवाडी तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रासह देशभर नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

त्या म्हणाल्या, “कोकणच्या मातीत निसर्गाने आपल्याला अतिशय समृद्ध अशी रानभाज्यांची परंपरा दिली आहे. या रानभाज्या केवळ आपल्या घरातील स्वयंपाकघरापुरत्या मर्यादित न राहता त्यांना व्यापक ओळख मिळाली पाहिजे. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची मोठी संधी आहे.”

“महिलांच्या हातातील पारंपरिक पाककलेला योग्य व्यासपीठ, प्रशिक्षण, आधुनिक पॅकेजिंग आणि बाजारपेठ मिळाली, तर अनेक महिला स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतात. इन्सुलीतील या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद ही पुढील वाटचालीची प्रेरणा आहे. हा उपक्रम भविष्यात महाराष्ट्रासह देशातील विविध भागांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

 

‘रानभाज्यांना ग्लोबल मार्केट मिळू शकते’ – विशाल परब

भाजपचे युवा नेते श्री. विशालजी प्रभाकर परब यांनी कोकणातील रानभाज्यांकडे केवळ पारंपरिक खाद्यपदार्थ म्हणून न पाहता त्यामध्ये मोठी आर्थिक, व्यावसायिक आणि निर्यातीची क्षमता असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, “कोकणातील रानभाज्या ही आपल्या निसर्गाची अमूल्य देणगी आहे. या भाज्यांचे योग्य संशोधन, दस्तऐवजीकरण, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि मार्केटिंग झाले, तर या नैसर्गिक संपत्तीला देश-विदेशात मोठी बाजारपेठ मिळू शकते.”

“आज जगभरात नैसर्गिक, पारंपरिक आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थांना मोठी मागणी आहे. त्यामुळे कोकणातील रानभाज्यांसाठी ही योग्य संधी आहे. गावातील महिलांच्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची आणि डिजिटल मार्केटिंगची जोड दिल्यास मोठे उद्योग उभे राहू शकतात. यातून महिलांना रोजगार, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना आणि कोकणच्या खाद्यसंस्कृतीला देश-विदेशात ओळख मिळू शकते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

महिलांसाठी सावंतवाडीत आठवडा बाजाराचा प्रयत्न

सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सावंतवाडीत आठवडा बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

स्थानिक महिलांनी तयार केलेल्या रानभाज्या, पारंपरिक खाद्यपदार्थ, घरगुती उत्पादने यांना थेट ग्राहक उपलब्ध झाल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे आठवडा बाजाराची संकल्पना प्रत्यक्षात आल्यास या उपक्रमाला आणखी व्यापक आर्थिक दिशा मिळण्याची शक्यता आहे.

 

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या रानभाज्या महोत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी डॉ. विजय दळवी – सहयोगी अधिष्ठाता, श्री. नितीन एकनाथ राऊळ – जिल्हा परिषद सदस्य, इन्सुली, श्री. सदाशिव विठ्ठल राणे – पंचायत समिती सदस्य, श्री. महेश शिवाजी सावंत – अध्यक्ष, विद्या विकास मंडळ, इन्सुली तसेच श्री. सचिन दळवी – उपाध्यक्ष, विद्या विकास मंडळ, इन्सुली, माजी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, खजिनदार सदानंद कोरगावकर, महेंद्र पालव, साईनाथ राणे, मुख्याध्यापक शेवाळे सर, अजय कोठावळे, पालव मॕडम, यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन सौ. गौरवी पेडणेकर मॕडम व शुभम धुरी यांनी केले. डॉ. विजय दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती, रानभाज्यांचे संवर्धन आणि स्थानिक महिलांच्या कौशल्याला व्यासपीठ मिळणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

 

रानभाज्यांपासून महिला उद्योजकतेपर्यंत…

इन्सुलीतील या महोत्सवाने एक महत्त्वाचा संदेश दिला आहे—कोकणच्या रानात उगवणारी प्रत्येक रानभाजी ही केवळ भाजी नसून ती परंपरा, आरोग्य, रोजगार आणि अर्थकारणाची संधी आहे.

रानभाज्यांचे संवर्धन, त्यांच्या औषधी गुणधर्मांवर संशोधन, आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञान, आकर्षक पॅकेजिंग आणि व्यापक मार्केटिंग यांची सांगड घातल्यास कोकणातील या नैसर्गिक संपत्तीला मोठी बाजारपेठ मिळू शकते. त्याचबरोबर ग्रामीण महिलांच्या पारंपरिक ज्ञानाला व्यावसायिक रूप देऊन ‘घरगुती पाककलेपासून महिला उद्योजकतेपर्यंत’चा प्रवास घडवून आणता येऊ शकतो.

त्यामुळे इन्सुलीचा रानभाज्या महोत्सव हा केवळ चव, परंपरा आणि खाद्यसंस्कृतीचा उत्सव न ठरता कोकणातील महिलांच्या स्वावलंबनाला नवी दिशा देणारा आणि रानभाज्यांना स्थानिक बाजारपेठेपासून थेट जागतिक बाजारपेठेपर्यंत नेण्याची क्षमता दाखविणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!