कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील बिबवणे- नाईकवाडी येथे मुबई – गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बंद घराचा कुलूप व कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उशिरा उघडकीस आली. चोरट्यांनी घरातील कपाटामधील सुमारे 8 तोळे वजनाचे अंदाजे 12 लाख रुपये किमतीचे (सध्याच्या बाजारभावानुसार ) सोन्याचे दागिने व एक लाख 9 हजार 500 रु. रोख रक्कम असा एकूण सुमारे 13 लाख 9 हजार 500 रु चा ऐवज लंपास केला.दिवसाढवळ्या झालेल्या या धाडसी चोरीमुळे बिबवणे परिसरात खळबळ उडाली असून चोरट्यांनी टेहळणी करूनच ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी घटनास्थळी शॉन पथक मागविण्यात आले.तसेच घटनास्थळावरील ठसेही घेण्यात आले. कुडाळ पोलीस व सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक चोरट्यांचा शोध घेत आहेत. या घटनेची फिर्याद सौ सरोज शरद चव्हाण ( रा. बिबवणे – नाईकवाडी) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. सरोज चव्हाण व त्यांचे पती शरद गंगातम चव्हाण हे सावंतवाडी तालुक्यात नोकरीला आहेत.सोमवारी सकाळी ते दोघे आपल्या घरातून कामावर गेले.तर त्याची मुलगी काही वेळाने म्हणजे सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास आपल्या घराला कुलूप करून बसने कॉलेजला जायला निघाली. घरात कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी- कोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून आत प्रवेश केला. एका बेडरूम मधील लोखंडी कपाट उघडले. आतील साहित्य काढून बाहेर विस्कटून टाकले. मात्र, त्यांना तेथे काहीच मौल्यवान वस्तू हाती लागली नाही. त्यानंतर चोरट्यांनी लागूनच असलेला दुसऱ्या बेडरूमचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. आतील लोखंडी कपाट उघडले आणि कोणत्या तरी हत्याराने त्या कपाटाचा लॉकर उचकटून तोडला.त्या लॉकरमध्ये असलेले सोन्याचे दागिने त्या चोरट्यांच्या हाती लागले. ते दागिने तसेच त्या कपाटातील 1 लाख 9 हजार 500 रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. सायंकाळी उशिरा पर्यंत त्याच्या घरी लाईट पेटलेली दिसली नाही.म्हणून शरद चव्हाण यांच्या घराच्या शेजारी राहणारे त्याचे काका रमाकांत चव्हाण तेथे गेले.तेव्हा त्यांना त्या घराच्या समोरच्या दरवाजाला कुलूप नव्हते. बंद दरवाजा ढकलून ते आत गेले असता, दोन्ही बेडरूमचे दरवाजा उघडलेले दिसले.पण घरात कुणीही नसल्याची खात्री झाली.कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त टाकलेले निदर्शनाला आले. त्यांनी याबाबत शरद चव्हाण व सरोज चव्हाण यांना कल्पना दिली. ते दांपत्य घरी आल्यानंतर सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. या चोरीत 20 ग्रॅम वजनाचा एक लाख रु. किमतीचा गळ्यातील सोन्याचा हार , 20 ग्रॅम वजनच्या 1 लाख रु.किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या, 15 ग्रॅम वजनाचे 75 हजार रु. किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट (मनगट पट्टी ) , 10 ग्रॅम वजनाचे 50 हजार रु. किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, 10 ग्रॅम वजनाची 50 हजार रु. किमतीची गळ्यातील सोन्यातील साखळी, 3 ग्रॅम वजनाची 15 हजार रु.किमतीची कर्णफुले, दीड ग्रॅम वजनाचे 7 हजार 500 रु किमतीचे कर्णफुल मिळून जुन्या बाजारभावानुसार 3 लाख 97 हजार 500 रु.चे सोन्याचे दागिने ( सध्याच्या बाजारभावानुसार अंदाजे 12 लाख रु.किमतीचे सोन्याचे दागिने) तसेच एक लाख 9 हजार 500 रु रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. काल रात्री या घटनेची माहिती कुडाळ पोलिसांना देताच पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्यासह त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांनीही घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक सचिन अवताडे ,सहायक पोलीस उपनिरीक्षक तात्या कोळेकर,हवालदार प्रमोद काळसेकर , सिद्धेश चिपकर,सुबोध मळगावकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलीस पाटील शैलेश राऊळ व ग्रामस्थानी त्यांना सहकार्य केले. सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखे (एल.सी बी ) चे पथकही घटनास्थळी दाखल झाले. या शाखेचे निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्यासह उपनिरीक्षक सुधीर सावंत व अनिल हडळ,हवालदार राजू गोसावी व अमर कांडर यांनीही घटनेबाबत माहिती घेतली.


