कुडाळ | रवी गावडे
✹ ३० सप्टेंबर ✹
नटसम्राट मच्छिंद्र कांबळी स्मृतिदिन
जन्म – ४ एप्रिल १९४७ (रेवंडी,सिंधुदुर्ग)
स्मृती – ३० सप्टेंबर २००७ (चेंबूर,मुंबई)
मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील रेवंडी येथे झाला. त्यांनी ‘वस्त्रहरण’ या पहिल्याच नाटकाद्वारे व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. अस्सल मालवणी बोलीतले लोकनाट्याच्या धर्तीचे हे नाटक मैलाचा दगड ठरले. कांबळी यांचा अभिनयाचा ठसा खऱ्या अर्थाने उमटला तो, ‘वस्त्रहरण’ मधील तात्या सरपंच या भूमिकेने. या नाटकाचे ४८९९ प्रयोग झाले. त्यानंतर पांडगो इलो रे, घास रे रामा, वय वर्ष पंचावन्न, भैय्या हातपाय पसरी, येवा कोकण आपलाच असा, माझा पती छत्रीपती अशी अनेक नाटके त्यांनी आपल्या भद्रकाली प्रॉडक्शन या नाटयसंस्थेमार्फत अनेक वर्ष चालवली. मच्छिंद्र कांबळी यांना वस्त्रहरण हे नाटक लंडनला न्यायचे होते. पण पुरेसे पैसे नव्हते. त्यावेळी त्यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर, नाना पाटेकर, अशोक सराफ, सचिन अशा बडया कलाकारांना घेऊन षण्मुखानंद मध्ये वस्त्रहरणचा विशेष प्रयोग केला. त्यानंतर वस्त्रहरणचा लंडनला प्रयोग केला. मच्छीँद्र कांबळी यांचे आणि मालवणी भाषेचा झेँडा सातासमुद्रापार पोहोचविणारे वस्त्रहरण हे पहिले मालवणी नाटक. भद्रकाली प्रॉडक्शन ही मच्छिंद्र कांबळी यांची संस्था. मच्छिंद्र कांबळे यांनी, मोहन गोखले यांच्या सल्ल्यानुसार स्वतःची नाटक कंपनी २९ मे १९८२ मध्ये काढली. आता भद्रकाली संस्थेची धुरा त्यांचे पुत्र प्रसाद कांबळी सांभाळत आहेत. या संस्थेने ‘वस्त्रहरण’, ‘घास रे रामा’ सारखी नाटके रंगभूमीवर आणून मालवणी मुलुखातल्या झणझणीत कोंबडी अन् कोंबडीवड्यांच्या परंपरेची नाटके दिली. ‘वस्त्रहरण’ तर माइलस्टोन ठरले. ‘मालवणी नटसम्राट’ असा लौकिकही मच्छिंद्र कांबळी यांनी मिळविला. मा.पु.ल. देशपांडे यांनी ‘वस्त्रहरण’ला दिलखुलास दाद दिली. अन् नंतर पुलंची प्रतिक्रिया जाहिरातीत टाकून मच्छिंद्र कांबळी यांनी ‘वस्त्रहरण’चे एक हजारावर प्रयोग केले. भद्रकाली प्रॉडक्शनने एकूण ५० हून अधिक नाटके मराठी रंगभूमीला दिली. मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर भद्रकालीची सूत्रे कविता कांबळी आणि प्रसाद कांबळी यांनी हाती घेतली अन् भद्रकालीच्या रूढ परंपरेला छेद देत, या संस्थेने अतिशय वेगळे, चाकोरीबाहेरचे नाटक रंगभूमीवर आणले. मच्छिंद्र कांबळी यांचे चिरंजीव प्रसाद कांबळी निर्माता आहेत ‘भद्रकाली’ची जबाबदारी सांभाळतात. मच्छिंद्र कांबळी यांची काही नाटके-वस्त्रहरण, सावळो गोंधळ, पांडगो इलो रे इलो, तुमच ते आमच, चालगती, केला तुका झाला माका, चाकरमानी,< घास रे रामा, येवा कोकण आपलोच आसा, राम तुझी सिता माउली, वाजले किती?, भैया हातपाय पसरी.
मालवणी सम्राटाला सुसाट परिवाराचा मानाचा मुजरा
