जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ठिकाणी झालेल्या राड्याचा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांनी केला निषेध

0

कुडाळ | प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये टेंडर मॅनेजसाठी मोठ्या प्रमाणात बाउन्सर आणून दहशतीचे वातावरण निर्माण केल्याच्या घटनेचे आपण निषेध करीत आहे, असे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) काका कुडाळकर यांनी सांगितले.

श्री.कुडाळकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजपर्यंत अशा प्रकारच्या घटना घडल्या नव्हत्या. परंतु जिल्हा परिषदेमध्ये लोकप्रतिनिधींचे राज्य नसल्यानंतर प्रशासन किती बेलाम पद्धतीने वागते याचे मुर्तीमंत उदाहरण जिल्हा परिषदेत आज दिसून आले. दुसरी एक खंत व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे की चार दिवसांपूर्वीच या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा परिषदेवर जे आरोप केले होते. ते आरोप त्यांनी केलेल्या कारवाईनंतर सुद्धा जसेच्या तसे आहेत याचे चित्र समोर आहे. वास्तविक पालकमंत्र्यांनी एखादी गोष्ट समोर आल्यानंतर त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे होती. अशा प्रकारची कुठची गोष्ट त्या ठिकाणी होता कामा नये याची दक्षता घेतली पाहिजे होती. त्याऐवजी त्या ठिकाणी टेंडर मॅनेजसाठी मोठ्या प्रमाणात बाउन्सर आणून काम घेण्यासाठी वेळप्रसंगी दुसऱ्यांना मारहाण करून आपली तुंडबी भरवण्याची प्रवृत्ती या ठिकाणी वाढीस लागलेली आहे. त्याला लगाम घालण्याचे काम आता पालकमंत्री चव्हाण यांच्यासमोर आहे. एक जबाबदार नागरिक व जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष म्हणून आपण पालकमंत्री चव्हाण यांना विनंती करेन की त्यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास करावा हे टेंडर जर खरोखरच मॅनेज झालेलं असेल तर ते रिटेंडर करावे, म्हणजे जिल्ह्यातील जनतेला समजून येईल की अशा प्रकारची कोणतीही दादागिरी प्रशासन खपवून घेतली घेत नाही आणि जे यामध्ये अधिकारी जबाबदार असतील, जे कोण ठेकेदार असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी विनंती आपण पालकमंत्री चव्हाण यांना करत आहे, असे श्री. कुडाळकर म्हणाले.