“करिअर कट्टा” उपकम : देवगड तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी
देवगड | प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील शिरगांव पेथिल पुंडलिक अंबाजी कर्ले कला आणि वाणिज्य महाविद्यालयात शासनाच्या महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र संचलीत “करीअर कट्टा” या उपक्रमाअंतर्गत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रास मंजूरी देण्यात आली आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे देवगड तालुक्यातील विद्यार्थ्यांना करिअर करण्याची संधी मिळणार आहे.
राज्यातील १०० महाविद्यालयांत अशा प्रकारची पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्यात येणार असून सिंधुदूर्ग जिल्ह्यात शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित देवगड तालुक्यातील शिरगांव येथिल पुंडलिक अंबाजी कर्ले कला आणि वाणिज्य महाविद्यालयाला ही संधी मिळाली आहे. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. या प्रशिक्षण केंद्रात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणा सोबतच अग्नीवीर प्रशिक्षण व अन्य अशा प्रकारच्या भरतीपूर्व प्रशिक्षणाचाही समावेश असणार आहे.
७ ऑक्टोबर पर्यत इच्छुक प्रशिक्षणार्थीचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत, ८ ऑक्टोबर रोजी मैदानी चाचणी होणार असून यामध्ये उंची व शारीरीक तपासणी करण्यात येणार आहे. ९ व १० ऑक्टोबर रोजी मुलाखती व अंतीम निवड यादी तयार करण्यात येणार आहे.
प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याकरीता महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, सिंधुदुर्गचे प्राचार्य प्रवर्तक डॉ. चंद्रकांत काकडे जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.अजित दिघे देवगड तालुका समन्वयक प्रा. बाळकृष्ण तेरुवाडकर, तसेच शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, सर्व संस्था पदाधिकारी, संचालक, प्राचार्य समीर तारी, व प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य लाभले आहे. देवगड तालुक्यातील युवक युवतींनी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
