देवगड | प्रतिनिधी
देवगड येथील युवती छेडछाड विनयभंगप्रकरणी अटक झालेल्या संशयितांपैकी पाचजणांना सिंधुदूर्ग अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. याकामी संशयित पोलिस कर्मचाऱ्याच्यावतीने अॅड. कौस्तुभ मराठे व अॅड. उमेश सावंत यांनी युक्तीवाद केला.
दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.३० वा.सुमारास देवगड एस्टी स्टँड येथून घरी जाणाऱ्या कॉलेज युवतीला वसई येथून पर्यटक म्हणून आलेल्या पोलिस कर्मचारी हरीराम मारूती गिते यांने मद्यधुंद अवस्थेत हात पकडून गाडीत ओढण्याचा प्रयत्न करून अपहरणाचा प्रयत्न केला होता.तसेच त्यावेळेस गाडीत बसलेले हरीराम गीते यांचे उर्वरीत ५ साथीदार प्रविण विलास रानडे, सटवा केशव केंद्रे, माधव सुगराव केंद्रे, शाम बालाजी गिते, शंकर संभाजी गिते यांनी सदर युवतीचे अपहरण करण्यासाठी चिथावणी दिली होती.घटनेच्या वेळी त्या युवतीने आरडाओरडा केल्यामुळे जमा झालेल्या नागरिकांनी घटनास्थळावरून पकडून त्यांना बेदम चोप देवून देवगड पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
देवगड पोलिसांनी संशयितांविरूध्द भारत न्याय संहीता कलम ७४,७५, १४०(१), १४०(३), १४०(४) सह ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करून सहा संशयितांना अटक केली होती. अटक झालेल्यांमध्ये हरीराम गीते व प्रविण विलास रानडे हे दोन वसई येथे पोलिस कर्मचारी, उर्वरीत संशयितांपैकी एकजण निमलष्करी दलात कर्मचारी व बाकीचे संशयित इतर शासकीय सेवेत असल्यामुळे जनप्रक्षोभ उसळला होता.अटकेनंतर संशयित आरोपींनी देवगड पोलिस स्थानकात पोलिस कर्मचाऱ्यांवर सुध्दा हल्ला केला यामुळे पोलिसांनी वाढीव कलम ७९ व कलम ३२ लावले होते.या घटनेनंतर देवगडमध्ये जनता, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांनी मोठे आंदोलन केले. आरोपींविरूध्द कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.
संशयित आरोपींना देवगड न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर संशयितांना जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले.याकामी संशयितांच्या वकीलांकडून काही डिजीटल पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले होते. संशयितांच्या वकीलांनी तपासकामाची पुर्तता, दबावापोटी झालेली कारवाई, घटनास्थळावरील आरोपींची अनुपस्थिती हे मुद्दे प्रामुख्याने न्यायालयासमोर मांडले होते.
न्यायालयाने हे मुद्दे ग्राह्य धरीत आरोपी २ ते ६ यांना जामीनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.मुख्य संशयित हरीराम गिते याला मात्र अद्याप जामीन मिळालेला नाही.
