विद्यार्थ्यांचा छळ करणाऱ्या त्या एस. टी. बस चालक, वाहकावर कायदेशीर कारवाई करा :- जांभवडे हायस्कूलच्या संस्था चालकांची मागणी

0

संस्थाचलकांसह शिक्षक पालक यांच्यावरील गुन्हे मागे घ्या शिक्षक भारती संघटनेची मागणी

 

कुडाळ | प्रतिनिधी 

जांभवडे येथील न्यू शिवाजी हायस्कूल समोर एस. टी. बस रोखून झालेले आंदोलन हे चालक, वाहक विद्यार्थ्यांचा करत असलेल्या छळाच्या विरोधात होते तसेच बस थांबा असताना त्या ठिकाणी बस थांबत नव्हती म्हणून हे आंदोलन केले होते. असे संस्था अध्यक्ष सुभाष मडव यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदन देऊन छळ करणाऱ्या त्या एस. टी. बस चालक व वाहकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 

न्यू शिवाजी हायस्कूलचे संस्था अध्यक्ष सुभाष मडव यांच्यासह सहसेक्रेटरी रामदास मडव, संस्था पदाधिकारी लवू घाडी, मनोहर गावकर, भरणी माजी उपसरपंच अनिल परब, घोडगे माजी सरपंच अमोल तेली, कुपवडे सरपंच दिलीप तवटे, नारायण गावडे, संजय पवार भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, पप्या तवटे, देवेंद्र सामंत, शिक्षक, ग्रामस्थ यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. 

जांभवडे हायस्कूल समोर एस.टी. बस रोखून विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी करून शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी संस्था अध्यक्ष सुभाष मडव यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांवर कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि या संदर्भात संस्था अध्यक्ष सुभाष मडव यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, हायस्कूल समोर पूर्वी बस थांबा होता कालांतराने हा बस थांबा हायस्कूलच्या ३०० मीटरवर करण्यात आला. या संदर्भात एस. टी. बस प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेटून ही समस्या सांगितली. काही दिवस पुन्हा हायस्कूल समोर बस थांबा सुरू केला. मात्र अलीकडे कुडाळ एस. टी. बस आगाराचे चालक, वाहक हे हायस्कूल समोर बसचा वेग कमी करतात आणि विद्यार्थी जेव्हा बसच्या मागे धावतात तेव्हा पुन्हा हा वेग वाढवतात असा विद्यार्थ्यांचा छळ हे बस चालक वाहक करत आहे आणि ४ ऑक्टोंबर रोजी अशा प्रकारचा छळ घोडगे ते कुडाळ जाणाऱ्या एस. टी. बस चालक वाहक यांनी केला म्हणून विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक यांनी आंदोलन केले. यावेळी कोणत्याही प्रकारे चालक, वाहकांना शिवीगाळ किंवा अन्य प्रकार करण्यात आले नाही. मात्र या चालक, वाहकांकडून विद्यार्थ्यांची छळवणूक केली गेली. त्यामुळे या चालक, वाहकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली तसेच त्यांनी चर्चाही केली.

 

गुन्हे मागे घेण्याची संघटनेची मागणी 

माध्यमिक शिक्षण समिती जांभवडे पंचकोशी संचलित शाळा न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे या ठिकाणी १९९० पासून एस. टी. थांबा आहे. परंतु कुडाळ आगाराचे अनेक चालक त्या ठिकाणी एस. टी. थांबवत नाहीत. त्यासाठी तोंडी व फोन द्वारे एस. टी. आगाराला कळवूनही यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही सध्या वाढत्या उन्हाचा त्रास व पावसाचा त्रास विद्यार्थ्यांना वारंवार सहन करावा लागतो.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर रोजी रास्ता रोको करण्यात आले. मात्र सदर प्रकरणात नाहक संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात कोणत्याही प्रकारे सदर व्यक्तींचा सहभाग नव्हता हे आंदोलन आपल्या हक्कासाठी उस्फूर्तपणे केलेले विद्याथ्यांचे होते. त्यामुळे सदर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर व पी. डी. चव्हाण यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या जवळ निवेदनाद्वारे केली आहे.