तेंडोलीचे रामकृष्ण मंडळ द्वितीय
कोलगावचे सिद्धिविनायक मंडळ तृतीय
कुडाळ | प्रतिनिधी
नारुर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय महिला भजन स्पर्धेत
मिटक्याचीवाडी पावशी येथील ब्राह्मण देव भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक तेंडोली येथील रामकृष्ण भजन मंडळाने, तर तृतीय क्रमांक कोलगाव सावंतवाडी येथील सिद्धिविनायक भजन मंडळाने पटकावला.
नवरात्रोत्सवानिमित्त नारुर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात दि ८ व ९ ऑक्टोबर असे दोन दिवस जिल्हास्तरीय महिला भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन दि. ८ रोजी सायंकाळी ७ वा. भाजपच्या महिला प्रदेश सदस्य संध्या तेरसे यांच्या हस्ते झाले. यावेळी नारुरच्या सरपंच वैष्णवी मेस्त्री, साधना माडये, नूतन आईर, महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष दीपक नारकर, राजा तेली, रवींद्र देसाई, प्रशांत सरनोबत, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर गावडे, बुवा रवींद्र गोसावी, पुरुषोत्तम नानचे, आबा तळेकर, चंद्रकांत माळवे, प्रदीप नारकर, अनंत भिके, प्रकाश तांबे, संजय सावंत, पोलीस पाटील गुंडू कदम, बालाजी तळेकर, अरविंद सावंत, उल्हास सावंत, ज्ञानेश्वर सरनोबत, पुंडलिक परब, विलास भागवत, झिलू सावंत, बाबाजी माळवे, ज्ञानदेव पारकर, संजय महाडेश्वर, परीक्षक नूतन परब, महेश परब व राजा सामंत व ग्रामस्थ उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना संध्या तेरसे यांनी सांगितले की, महिला आज इतर क्षेत्रांत सोबतच भजन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे सांगून महालक्ष्मी मंदिर देवस्थान समितीने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित केलेल्या भजन स्पर्धा उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी सरपंच वैष्णवी मेस्त्री, माजी सभापती नूतन आईर, देवस्थानचे अध्यक्ष दीपक नारकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या मिटक्याचीवाडी पावशी येथील ब्राह्मण देव भजन मंडळाला अनंत सीताराम भिके पुरस्कृत रुपये ७७७७/- आणि चषक प्रदान करण्यात आला. द्वितीय क्रमांक प्राप्त तेंडोली येथील रामकृष्ण भजन मंडळाला प्रदीप नारकर पुरस्कृत रुपये ५७७७/- व चषक प्रदान करण्यात आला. तर तृतीय क्रमांक प्राप्त कोलगाव सावंतवाडी येथील सिद्धिविनायक भजन मंडळाला प्रकाश तांबे पुरस्कृत रुपये ३७७७/- व चषक प्रदान करण्यात आला. या स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिक चाफेखोल येथील ॐ आदिनाथ सिद्ध महापुरुष भजन मंडळाला मिळाले. त्यांना संजय महाडेश्वर पुरस्कृत रुपये २७७७/- प्रदान करण्यात आले.
वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट हार्मोनियम वादक कु. साक्षी मेस्त्री (नृहसिंह भजन मंडळ आवळेगाव), उत्कृष्ट पखवाज वादक आकांश घाडी (श्री ब्राह्मण देव भजन मंडळ, पावशी मिटक्याचीवाडी), उत्कृष्ट तबला वादन प्राजक्ता परब (बालगोपाळ भजन मंडळ हरकुळ खुर्द कणकवली), उत्कृष्ट गायन प्रियंका तवटे (श्री ब्राह्मण देव भजन मंडळ पावशी), उत्कृष्ट झांज कु. अंकिता पारकर (सातपाटेकर भजन मंडळ निरवडे सावंतवाडी), उत्कृष्ट कोरस सिद्धिविनायक भजन मंडळ कोलगाव सावंतवाडी) तर शिस्तबद्ध पथक (बालगोपाळ भजन मंडळ हरकुळ खुर्द कणकवली) यांना या सर्वांना प्रत्येकी रुपये ७७७/- देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षण नूतन परब आणि महेश परब यांनी केले. या स्पर्धेसाठी राजा सामंत यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
