निलेश राणे यांच्या पक्षप्रवेशावेळी हजारोच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार- संजय आंग्रे

0

कुडाळ‌ | प्रतिनिधी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे हे बुधवारी शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दिली या पक्षप्रवेश कार्यक्रमा वेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कुडाळ तालुका शिवसेना कार्यालय येथे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक व ठाणे नगरसेवक बाळा चिंदरकर, दीपक वेतकर, जिल्हा संघटक रुपेश पावसकर, मालवण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, रत्नाकर जोशी, राजा गावकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आंग्रे यांनी सांगितले की, कुडाळ हायस्कूलच्या भव्य मैदानावर हा पक्ष प्रवेश सोहळा बुधवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या पक्ष प्रवेशाच्या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री केसरकर, रवींद्र फाटक, भरत गोगावले तसेच शिवसेनेचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत. या पक्ष सोहळ्याला सुमारे १५ ते २० हजार पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत राणे यांना मानणारा ही एक वेगळा गट आहे त्यामुळे मोठ्या संख्येने इथे सर्वजण उपस्थित राहतील. निलेश राणे यांच्या प्रवेशानंतर त्यांचे सहकारी तसेच बरेच जण पक्ष प्रवेश करणार आहेत असे ही त्यांनी सांगितले.

 महायुतीचे तीनही उमेदवार विजयी होतील

या जिल्ह्यात महायुतीने दिलेले तीनही उमेदवार कसे निवडून येतील याकरिता महायुतीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कार्यरत राहणार असून तीनही महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचेही आंग्रे यांनी सांगितले. दरम्यान उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश कार्यक्रम स्थळी जात मंडप तसेच इतर गोष्टींची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधितांना दिल्या.