कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांमध्ये ८ जणांकडून ११ उमेदवारी अर्ज दाखल

0

उद्या बुधवार ३० ऑक्टोंबर रोजी होणार अर्जांची छाननी 

 

शिवसेना निलेश राणे, उबाठा शिवसेना वैभव नाईक, बहुजन समाज पार्टी रवींद्र कसालकर, राष्ट्रीय समाज पक्ष सौ. उज्वला येळावीकर, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष अनंतराज पाटकर, अपक्ष सौ. स्नेहा नाईक, वैभव जयराम नाईक, प्रशांत सावंत यांनी दाखल केले अर्ज

कुडाळ | प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीसाठी आज मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात ८ जणांकडून ११ अर्ज दाखल झाले आहेत.बुधवारी अर्जाची छाननी होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैभव विजय नाईक यांनी ३ तर शिवसेना पक्षाकडून निलेश नारायण राणे यांनी २ अर्ज भरले आहेत.

दि. २२ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली. त्यानंतर कुडाळ मतदार संघात पहिले काही दिवस कोणी अर्जच दाखल केला नव्हता. २४ ऑक्टोबर रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव विजय नाईक यांनी या मतदार संघातून पहिला अर्ज दाखल केला. त्यानंतर शिवसेनेचे निलेश नारायण राणे यांनी २८ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल केला. वैभव विजय नाईक यांनी एकूण तीन अर्ज तर निलेश नारायण राणे यांनी एकूण २ अर्ज दाखल केले आहेत. त्याशिवाय वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

त्या व्यतिरिक्त कुडाळ मालवण मतदार संघातून बहुजन समाज पार्टीच्या वतीने रवींद्र हरिश्चंद्र कसालकर, राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सौ. उज्वला विजय येळावीकर, महाराष्ट्र स्वराज पक्षाच्या वतीने अनंतरज नंदकिशोर पाटकर यांनी अर्ज दाखल केला आहे. तर अपक्ष म्हणून सौ. स्नेहा वैभव नाईक यांच्यासह वैभव जयराम नाईक आणि प्रशांत नामदेव सावंत यांनी अर्ज दाखल केला. कुडाळ मालवण मतदार संघातून ८ जणांनी एकूण ११ अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी या अर्जाची छाननी केली जाणार आहे. ४ नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.