कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
कुडाळ | प्रतिनिधी
पणदुर येथील दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकणारा ओरोस येथील १६ वर्षीय हार्दिक श्याम करमळकर हा विद्यार्थी बेपत्ता झाला आहे याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात त्याचे वडील श्याम बाबी करमळकर यांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान हा विद्यार्थी मुंबईच्या दिशेने गेला असावा असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या विद्यार्थ्याला कुणीतरी फुस लावून पळून घेऊन गेल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ओरोस रवळनाथ नगर येथील श्याम करमळकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, हार्दिक करमळकर हा पणदूर येथे इयत्ता ११ वी मध्ये विज्ञान शाखेत शिकत असून २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वा. ओरोस येथून पणदूर येथे महाविद्यालयाला जातो असे सांगून घरातून निघून गेला. त्यानंतर तो दुपारपर्यंत घरी परतला नसल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी मित्र तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली असता तो सापडून आला नाही. दरम्यान याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात हार्दिक करमळकर बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली यावरून कोणीतरी फूस लावून पळून नेले म्हणून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
