भारतीय जनता पार्टीच्या कुडाळ मंडळाची सदस्य नोंदणी बैठक उत्साहात संपन्न
कुडाळ | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान संदर्भात कुडाळ मंडळच्या बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांची बैठक आज महालक्ष्मी हाॅल कुडाळ येथे पार पडली. यावेळी जिल्हा सरचिटणीस व सदस्यता नोंदणी अभियानाचे जिल्हा संयोजक रणजीत देसाई, मंडळ अध्यक्ष मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ज्येष्ठ नेते राजू राऊळ, प्रदेश सदस्य बंड्या सावंत, महिला मोर्चा अध्यक्ष आरती पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य पप्या तवटे, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, विधानसभा निरीक्षक मोहन सावंत व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्याबद्दल माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव रुपेश कानडे यांनी मांडला तसेच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव नगरसेवक राजीव कुडाळकर यांनी मांडला. या दोन्ही ठरावांना सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले.
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे किमान एक लाख सभासद करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक बुथ अध्यक्ष, शक्ति केंद्रप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी झटून कामाला लागावे, तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्यात यावी असे आवाहन या अभियानाचे जिल्हा संयोजक रणजीत देसाई यांनी केले. पक्षाचे नेते खासदार नारायण राणे, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे किमान तीन लाख सभासद करण्याचा निर्धार देखील यावेळी व्यक्त करण्यात आला. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये देखील पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यशाची परंपरा अखंडित ठेवायची असल्याने सर्वच कार्यकर्त्यांनी आतापासूनच नव्या उत्साहाने कामाला लागावे असे देखील रणजीत देसाई यांनी सांगितले.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते राजू राऊळ यांनी पक्ष सभासदत्वाचे महत्त्व सांगून सर्वांनी जास्तीत जास्त वेळ देऊन सभासद करावेत असे आवाहन केले. मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी झालेल्या विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या गावागावातील कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली व त्यामुळेच निलेश राणे यांच्या रूपाने महायुतीचे आमदार निवडून आले त्याबद्दल सर्वच कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे यांनी केले.
