कुडाळ येथे एटीएम मशीन फोडणाऱ्या दोन चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

0

 

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ शहरातील खरेदी विक्री संघ येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीन मधील १२ लाख ६५ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम चोरताना कुडाळ पोलिसांनी २ चोरट्यांना रंगेहात पकडले. दरम्यान यामधील एका आरोपीने पळ काढला मात्र हा आरोपी पणदूर येथे पोलिसांच्या हाती लागला तर अजून दोन आरोपीने कार गाडीतून पळ काढला ते अद्याप सापडून आलेले नाहीत अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे दिली.

कुडाळ येथील खरेदी विक्री संघाच्या परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे हे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न उघड झाला याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे माहिती दिली त्यांनी सांगितले की, खरेदी विक्री संघाच्या साधना बाजार जवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये कोणीतरी इसम संशयास्पद हालचाल करीत असल्याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली त्याबरोबर राखीव असलेले पोलीस ममता जाधव, शांताराम वराडकर, रिडन बुथेलो, श्री चिंदरकर हे एटीएमच्या ठिकाणी गेले त्यावेळी त्या ठिकाणी एटीएम मशीनच्या गाळ्यामध्ये कोणीतरी आत मध्ये काहीतरी करत असल्याचा आवाज येत होता या गाळ्याचे शटर बंद होते. राखीव पोलिसांनी सावधगिरी बाळगत आवाज दिला. त्याबरोबर एटीएम मशीन फोडून त्यामधील रोख रक्कम असलेले बॉक्स बाहेर काढून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी या आरोपींवर झडप घातली. यामधील एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला तर दुसरा आरोपी रोख रक्कम असलेला एक बॉक्स घेऊन हिंदू कॉलनीच्या दिशेने पळाला त्याचा पाठलाग करण्यात आला मात्र तो अंधाराचा फायदा घेऊन पळाला त्यानंतर राखीव पोलिसांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याशी संपर्क साधल्यानंतर घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक गणेश कराडकर, संजय कदम, रुपेश सारंग, कृष्णा केसरकर, अमोल महाडिक तसेच इतर पोलीस कर्मचारी दाखल झाले आणि पळ काढलेल्या चोराच्या मागावर गेले.

पणदूर येथे सापडला दुसरा चोर

रोख रक्कमेचा बॉक्स घेऊन पळालेला चोर पणदूर येथे सापडला हा चोर हिंदू कॉलनी मार्गे महामार्गावर गेला पावशी या ठिकाणी कोणाची तरी सायकल घेतली आणि सायकलच्या कॅरिअरला रोख रकमेचा बॉक्स टी-शर्टाने बांधून तो ओरोसच्या दिशेने जात असताना पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना तो महामार्गावर दिसून आला त्याची चौकशी केली असता त्याने सायकल व तो रोख रकमेचा बॉक्स टाकून जवळच असलेल्या हातेरीवरून येणाऱ्या पावशी येथील नदीमध्ये उडी घेतली आणि पुन्हा तो पळाला दरम्यान सर्व पोलीस यंत्रणेला याबाबतची माहिती देण्यात आली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यामध्ये सामील झाली पणदूर येथे पोलीस यंत्रणा दाखल झाल्यावर त्या ठिकाणी एका दुकानांमध्ये वडापाव खात असताना हा आरोपी पोलिसांनी पकडला.

दोन आरोपी पळाले

ही चोरी करण्यासाठी चार आरोपी आले होते दोन आरोपी एटीएम मशीनच्या ठिकाणी तर दोन आरोपी कार मध्ये होते ही कार एटीएमच्या समोर उभी करून ठेवण्यात आली होती या आरोपींना पकडताच कारमधील दोन्ही आरोपीने कारसह पलायन केले त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान या चोरीमध्ये सुमारे १२ लाख ६५ हजार ९०० रुपये रक्कम मिळाली आहे याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक गावडे यांनी नोटांची तपासणी केली.

दिल्ली वरून आला अलर्ट 
या चोरट्याने सर्व सावधगिरी बाळगली एटीएम मशीनच्या आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर कट केल्या त्यानंतर गॅस कटरणे मशीन कापली आणि चोरी करायला सुरुवात केली ही चोरी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास सुरू केली दरम्यान एटीएम मशीनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी दिल्ली येथे झाली दिल्ली येथील कर्मचाऱ्यांनी मुंबई व नंतर कुडाळ येथे एटीएम मशीनच्या खोलीमध्ये काहीतरी वेगळ्या हरकती दिसत असल्याचे पोलीस यंत्रणेला कळवले ही माहिती समजल्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्याचे राखीव असलेले चार पोलीस कर्मचारी एटीएमच्या ठिकाणी दाखल झाले आणि ही चोरी उघड झाली चोरी मधील मुद्देमाल आणि चोरही रंगेहात सापडले.