पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या पावशी येथील दिगंबर पावसकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

0

 

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ पोलीस ठाणे येथील अंमलदार कक्षात येऊन पोलिसांना शिवीगाळ करून महिला पोलिसांच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्या पावशी येथील दिगंबर सहदेव पावसकर याच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरांना पिंगुळी गुढीपूर येथे पकडले होते. त्यापैकी डंपर क्रमांक (एमएच- ०६- एक्यू- ७०९७) याचा चालक याने महसूलच्या कर्मचाऱ्यांवर डंपर घालून त्यांना जीवे ठार मारण्यात याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील हा डंपर कोणाचा आहे हे तपासल्यानंतर पोलीस ठाण्याचे अंमलदार यांना सहाय्य असणाऱ्या महिला पोलीस प्रतिभा वालावलकर व पोलीस हवालदार बंडगर हे पावशी येथे डंपर मालक मनीष दिगंबर पावसकर यांच्या घरी गेले. त्यावेळी त्या ठिकाणी मनीष पावसकर याचे वडील दिगंबर पावसकर हे बाहेर आले. पोलिसांनी घडलेली घटना सांगितली. त्यावेळी दिगंबर पावसकर यांनी त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली. आणि माझा मुलगा असे करू शकत नाही. तो गोवा येथे गेला आहे असे सांगितले. त्यानंतर आपण पोलीस स्टेशनमध्ये येतो असेही सांगितले. 

दरम्यान दिगंबर पावसकर हे पोलीस ठाणे येथे आल्यावर अंमलदार कक्षामध्ये मोठ मोठ्याने बोलत होते तसेच भ्रमणध्वनीवरून शिव्या देत होते. त्यावेळी त्या ठिकाणी नायब तहसीलदार प्रतीक आढाव, उपनिरीक्षक क-हाडकर तसेच महसूलचे कर्मचारी, पोलीस महिला कर्मचारी उपस्थित होते. त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी येथे मोठ्याने बोलू नका. तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे सांगितले. हे ऐकल्यानंतर दिगंबर पावसकर यांनी अंमलदार कक्षातील पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली तसेच त्या ठिकाणी असलेल्या महिला पोलिसांच्या मनात लज्जा निर्माण होईल अशी कृती केली. त्यामुळे कुडाळ पोलीस ठाण्यात महिला पोलीस प्रतिभा वालावलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिगंबर पावसकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.