वेताळ बांबर्डे गावातील नागरिकांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदाधिकाऱ्यांकडे मागणी..
कुडाळ | प्रतिनिधी
वेताळ बांबर्डे ते हिर्लोक-नारुर या मार्गावर वेताळ बांबर्डे गावच्या हद्दीत मार्गाची झालेली खड्डेमय स्थितीवर
वेताळ बांबर्डेवासियांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी वेताळ बांबर्डे गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे, साचलेला चिखल आणि पाणी यामुळे नागरिकांना होणारा त्रास नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे मांडला. मागील काही वर्षात वेतोबा मंदिर, अभिनव नगर, कपिलनगर, ब्राह्मणवाडी, पावणाई टेंब, भोगलेवाडी या भागात मार्गावर मोठे खड्डे पडले असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे अपघात घडले असून त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगण्यात आले. तसेच रस्त्यावर पाणी साचून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसात मार्गावरील खड्डे बुजवावेत अन्यथा याप्रश्नी आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता पिसाळ यांना देण्यात आला. यावर अभियंता यांनी या मार्गाची पाहणी करून पुढील आठ दिवसात खड्डे बुजविण्यात येतील, असे वेताळ बांबर्डेवासियांना आश्वासित केले. यावेळी सरपंच वेदिका दळवी, प्रसाद गावडे, साजुराम नाईक, दशरथ बांबर्डेकर, अवधूत सामंत, विलास बांबर्डेकर, अरविंद बांबर्डेकर, सुस्मिता बांबर्डेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


