Sunday, September 6, 2026
Google search engine
Homeआपलं कोंकणअखिल भारतीय समता परिषदेची सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी काका कुडाळकर यांच्याकडे ...

अखिल भारतीय समता परिषदेची सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी काका कुडाळकर यांच्याकडे …

 

कुडाळ | प्रतिनिधी 

       राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष ना.छगन भुजबळ यांनी आपल्यावर सिंधुदुर्ग – रत्नागिरी या दोन जिल्ह्याच्या समन्वयक पदाची जबाबदारी सोपविली आहे. समता परिषद हि राजकीय पक्ष विरहित परिषद आहे. या परिषदेच्या माध्यमातून या जिल्ह्यातील ओबीसी आणि अन्य आरक्षित समाजाचे प्रश्न दूर करून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याची माहीती, समता परिषदेचे सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक काका कुडाळकर यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली. कुडाळ येथे गुरूवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत श्री.कुडाळकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत शैलेश लाड व सर्फराज नाईक उपस्थित होते.

     श्री.कुडाळकर म्हणाले, ओबीसी समाजाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी 1 नोव्हेंबर 1992 साली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली. त्यानंतर 7 जुलै 1993 रोजी ओबीसी समाजाच्या हितासाठी पहिला मेळावा घेतला. या मेळाव्याला दिग्गज नेते मंडळी उपस्थित होती. त्याचवेळी राज्यात मंडल आयोग लागू करण्या संदर्भात ठराव घेण्यात आला. नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना 1994 साली हा मंडल आयोग राज्यात लागू करण्यात आला. या समता परिषदेने मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न मार्गी लावला. रामलीला मैदान, बिहार, राजस्थान जयपूर, गोवा आदी ठिकाणी घेण्यात आलेल्या समता परिषदेच्या मेळाव्यांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. अशाप्रकारे समता परिषदेच्या माध्यमातून देशभरात ओबीसींचे जाळे निर्माण झाले. जेव्हा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचे वादळ निर्माण केले, तेव्हा त्यांच्या भूमिकेला कुठेही छेद न देता मराठा समाजाला आरक्षण मिळावे याचा पुनरूच्चार करताना हे आरक्षण ओबीसी कोट्यातून न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे, असे श्री.भुजबळ यांनी सांगत ओबीसींचे हित राखले. त्यांच्या नेतृत्वाखाली समता परिषदेच्या माध्यमातून सर्वत्र ओबीसींची चळवळ सुरू आहे. हि समता परिषद राजकीय पक्ष विरहित असून यामध्ये ओबीसी व अन्य आरक्षित समाजाचे हित राखायचे आहे, असा कार्यकर्ता यात सहभाग घेऊ शकतो. ओबीसींच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक या गरजांकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक गोष्टींमध्ये या जिल्ह्यात ओबीसी समाज दबलेला गेला आहे. या दबलेल्या समाजाचा आवाज बुलंद करण्याचा काम या ठिकाणी समता परिषदेच्या माध्यमातून करण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. यापूर्वी समता परिषदेच्या माध्यमातून फारसंमे काम या दोन जिल्ह्यात उभे राहिलेले नाहीये. त्यामुळे ते एक आव्हान आहे. परंतु प्रत्येक तालुक्यात ओबीसींना आधार देण्याचे काम समता परिषदेच्या माध्यमातून आम्हाला करायचे आहे. ओबीसी आर्थिक विकास महामंडळ, शामराव पेजे ओबीसी विकास महामंडळाकडून राबविण्यात येणा-या ज्या योजना आहेत, त्या तळागाळापर्यंत न्यायच्या आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांचा डेटा गोळा करून त्यांना जास्तीत शैक्षणिक सुविधात्मक योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे श्री.कुडाळकर म्हणाले.

      महाज्योतीचे उपकेंद्र रत्नागिरीत होण्यासाठी तसेच ओबीसींचे वसतिगृह जिल्ह्यात होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यात ओबीसी समाजाची ताकद मोठी आहे. येणा-या जनगणनेत ओबीसी समाजाला जागृत करण्याचे काम केले जाणार आहे. समाजातील सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक मागासलेपणा दूर करून, ओबीसी व अन्य आरक्षित समाजाची चळवळ व्यापक करण्यावर भर देण्यात येणार आहे. लवकरच जिल्हाभरात तालुकावार दौरा करून समता परिषदेची एक यंत्रणा उभारली जाणार आहे. गणेशोत्सवानंतर ओबीसी समाजाचे जेष्ठ नेते तथा मंत्री श्री.भुजबळ यांना जिल्ह्यात आमंत्रित करण्यात येणार आहे. समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. उपाध्यक्ष शिवाजी कार्डिले, समीर भुजबळ, पंकज भुजबळ व महाज्योतीचे श्री.गमे या सर्व मंडळींच्या सहकार्याने ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री.कुडाळकर यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!