२१० ब्रास सापडली वाळू; महसूल विभागाची कारवाई
कुडाळ | प्रतिनिधी
झाराप मुस्लिमवाडी येथे अवैध वाळू साठा महसूल विभागाने पकडला असून हा साठा २१० ब्रासचा आहे. मुस्लिमवाडी येथील इर्शाद मुजावर हा साठा करून ठेवल्याचे उघड झाले आहे. याबाबत शासकीय प्रक्रिया सुरू असून बाजारभावाच्या पाचपट दंड आकारण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे.
झाराप मुस्लिमवाडी येथे अवैद्य वाळू साठा असल्याची माहिती महसूल विभागाला समजल्यानंतर कुडाळ तहसील कार्यालयातील निवासी नायक तहसीलदार मंदार बिगारे, मंडळ अधिकारी जांभवडेकर, तलाठी कांबळे हे मुस्लिमवाडी येथे गेल्यावर त्यांना हा साठा आढळून आला. सुमारे २१० ब्रास एवढा वाळू साठा असून हा वाळू साठा मुस्लिमवाडी येथील इर्शाद मुजावर यांचा असल्याचे उघड झाले आहे. याची पंचयादी करण्याचे प्रक्रिया सुरू आहे याबाबत कुडाळ तहसीलदार यांना विचारले असता ते म्हणाले की हा २१० ब्रास साठा सापडून आला आहे जर त्यांचा हा साठा अधिकृत असेल तर त्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी अवधी दिलेला आहे आणि हा साठा जर अवैद्य असेल तर त्यांना बाजारभावाच्या पाचपट एवढा दंड आकारला जाऊ शकतो प्रथम दर्शनी हा साठा अवैध असल्याचे निदर्शनास आले आहे असे त्यांनी सांगितले इतर प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.


