सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)–
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कै. अजित दादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या जयंतीनिमित्त येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य सेवा सप्ताहाचा सिंधुदुर्गातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले.
सिंधुदुर्ग नगरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला राणे यांनी आज भेट दिली आणि शुभेच्छा दिल्या.
राणे यांनी यावेळी कै. अजित दादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले त्यानंतर त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजितदादा गट ) अबीद नाईक, भाजपाचे ओरोस मंडळ अध्यक्ष भाई सावंत, जि. प.सदस्य सुप्रिया वालावलकर, छोटू पारकर, आदी भाजपाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यानंतर पालकमंत्री राणे यांनी बाह्य रुंग्ण विभागातील विविध कक्षांना भेटी देत पहाणी केली. आरोग्य शिबिराला सिंधुदुर्ग वासियांकडून मिळत आसलेला प्रतिसाद पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. कँसर सारख्या दुर्धर आजारावरही या शिबिरात तपासणी करून मार्गदर्शन केले जात आहे हे पाहून लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी त्यांचे सोबत रुंग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अनंत डवंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, अन्य तज्ञ् डॉक्टर्स उपस्थित होते.
सर्वसामान्य जनतेला आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देणे ही सर्वोत्तम सेवा आहे या सेवेचा लाभ देण्याचे काम वैद्यकीय महाविद्यालयातर्फे होत आहे हीच कै. अजित दादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असे उदगार त्यांनी काढले. तसेच अशाच प्रकारची आरोग्य शिबीरे सर्व ग्रामीण रुंग्णालयात आयोजित करावीत अशा सूचना त्यांनी दिल्या.
वैद्यकीय महाविद्यालय आणि रुंग्णालयात भरती करताना स्थानिकांना प्राधान्य द्यावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
रुंग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होत नाहीत याकडे कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री राणे यांचे लक्ष वेधले असता त्याची गंभीर दखल घेत यासंदर्भात योग्य कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले.
काल दि. 22 जुलै रोजी या आरोग्य सेवा साप्ताहाला आणि शिबिराला प्रारंभ झाला. या शिबिराला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


