सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरुर वाघचौडी येथील ५२ गावडे कुटुंबाचा माड्याचीवाडी येथे विराजमान झालेल्या महाराजाच्या गणेशोत्सवा दरम्यान एक अद्वितीय परंपरा आजही जपली जात आहे. गावडे घराण्यातील ५२ नोंदणीकृत कुटुंबीय एकत्र येऊन दरवर्षी आपल्या गणरायासाठी नित्यनियमाने नैवेद्य तयार करतात. सर्व कुटुंबीयांनी मिळून ५२ पारंपरिक चुली उभारल्या आणि एकाच वेळी या चुलींवर नैवेद्याची तयारी करण्यात आली. गोळा केलेल्या लाकडांवर पेटलेल्या अग्नीवर शिजवलेला हा नैवेद्य पारंपरिकता, शुद्धता आणि श्रद्धेचे द्योतक ठरला.
ही अनोखी परंपरा केवळ घराण्याच्या नव्हे तर जगभरात क्वचितच पाहायला मिळणारी आहे, ज्यात श्रद्धा, सातत्य, शाश्वतता आणि कौटुंबिक एकतेचे अनोखे दर्शन घडते. या वारशाचे जतन करत गावडे कुटुंबीयांनी २९ ऑगस्ट २०२५ रोजी, नेरुर (कुडाळ), महाराष्ट्र येथे एक अद्वितीय जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
��️ वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाच्या चीफ एडिटर सुषमा नार्वेकर यांची प्रतिक्रिया…!
“गावडे घराण्याचा हा उपक्रम म्हणजे केवळ परंपरेचे जतन नव्हे, तर तो श्रद्धा, एकोपा आणि शाश्वततेचा जागतिक संदेश आहे. आजच्या युगात इतक्या मोठ्या प्रमाणावर पारंपरिक पद्धतीने नैवेद्याची तयारी करणे हे खरोखरच अनोखे आहे. या विश्वविक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया मध्ये नोंदवली आहे.”


