Tuesday, August 11, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळविकास संस्थेच्या सभासदांना सर्व कर्जावर १% व्याज सवलत, शेअर रक्कम ५%...

विकास संस्थेच्या सभासदांना सर्व कर्जावर १% व्याज सवलत, शेअर रक्कम ५%…

कर्ज प्रक्रिया ९० दिवसांवरून ७ दिवसांवर; १००% ऑनलाईन प्रणाली लागू

*संगणकीकरणामुळे विकास संस्थांमध्ये पारदर्शकता व शिस्त – अध्यक्ष मनीष दळवी*  

*१००% कर्ज वसुली करणाऱ्या ३४ संस्थांचा कुडाळात गौरव*

 

*कुडाळ (प्रतिनिधी) :* जिल्हा बँकेचा गृह कर्जाचा व्याजदर जर १०.५०% असेल, तर विकास सहकारी संस्थेमार्फत शेतकरी सभासदाने गृह कर्ज घेतल्यास त्याला *९.५०% व्याजदराने* कर्ज देण्यात येईल. सर्व प्रकारच्या कर्जावर विकास संस्थेच्या सभासदांसाठी *१% कमी व्याजदर* ठेवण्यात आला असून, कर्जासाठी आवश्यक *शेअर रक्कम १०% वरून ५%* करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष *मा. मनीष प्रकाश दळवी* यांनी दिली.

कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये मंगळवारी झालेल्या *‘प्राथमिक विकास संस्था सक्षमीकरण मेळाव्या’*त ते बोलत होते.

*कर्ज प्रक्रिया गतिमान व १००% ऑनलाईन*

अध्यक्ष दळवी म्हणाले, “कर्ज मंजुरीसाठी पूर्वी ९० दिवस लागत होते. आता संगणकीकरणामुळे ही प्रक्रिया *फक्त ७ दिवसांत* पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

*नवीन कार्यपद्धती अशी :*

1. *अपलोड त्याच दिवशी* : सचिवांनी कागदपत्रे स्कॅन करून त्याच दिवशी बँकेच्या पोर्टल/अ‍ॅपवर अपलोड करायची. तालुका/जिल्हा कार्यालयात जाण्याची गरज नाही.

2. *संचालक मंडळ बैठकीची गरज नाही* : चेअरमन व सचिवांच्या सहीने ऑनलाईन कर्ज मागणी नोंदवता येईल.

3. *तात्काळ नोंद* : मागणी नोंदवल्या क्षणीच ती तालुका कार्यालय व मुख्य कार्यालयाला दिसेल.

4. *४८ तासांत पाहणी* : विकास अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करायची असल्यास ४८ तासांत करून मत २४ ते ४८ तासांत पोर्टलवरच नोंदवायचे. प्रस्ताव ऑनलाईनच मुख्य कार्यालयाला जाईल.

5. *२४ तासांत मंजुरी* : मुख्य कार्यालयात प्रस्ताव आल्यावर २४ तासांच्या आत मंजुरी पत्र पोर्टलवर अपलोड केले जाईल.

6. *५ लाखांपर्यंत थेट अधिकार* : ५ लाखांपर्यंतचे कर्ज अधिकाऱ्यांना थेट मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहेत. संचालक मंडळाची कार्योत्तर मंजुरी नंतर घेतली जाईल.

7. *२४ तासांत वाटप* : मंजुरीनंतर कागदपत्रे थेट ब्रँच मॅनेजरकडे देऊन २४ तासांत रक्कम खात्यात जमा केली जाईल.

कर्ज उपसमितीमध्ये चेअरमन, व्हा. चेअरमन व १-२ संचालक घेऊन धावत्या बैठकीद्वारे मंजुरी देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. “वेळेची व व्याजदराची मर्यादा कमी करून शेतकऱ्याला त्रास न होता घरबसल्या कर्ज देऊ,” असे दळवी म्हणाले.

*संगणकीकरणामुळे विश्वासार्हता वाढली*

“पूर्वी विकास संस्थांमध्ये पारदर्शकतेचा अभाव होता. केंद्र शासनाने संगणकीकरणाचा कार्यक्रम हाती घेतल्यामुळे आता प्रत्येक संस्थेचा तीन दिवसांतील व्यवहार, ताळेबंद, जमा रक्कम सचिव जागेवर नसला तरी विकास अधिकारी, मुख्य कार्यालय, नाबार्ड, राज्य व केंद्र शासन एका क्लिकवर पाहू शकतात. यामुळे आर्थिक शिस्त व पारदर्शकता आली आहे,” असे दळवी यांनी सांगितले.

“सभासदाने प्रश्न विचारताच सचिवाने क्लिक केले की त्याची प्रिंट बाहेर येते. सर्व संस्थांचे बॅलन्स शीट, आर्थिक पत्रके आता समान पद्धतीने तयार होतात. पुढील काळात आधार, पॅन, सातबारा लिंक करून सभासदाला किती कर्ज मिळू शकते हे सचिव एका क्लिकवर सांगू शकेल,” असेही ते म्हणाले.

*सचिव यंत्रणा सक्षम करणार*

“६० ते ७०% संस्थांमध्ये सचिवांचा पगार ५ ते ७ हजार आहे. प्रवास, पेट्रोल खर्च करून महिनाअखेर १-२ हजार उरतात. त्यामुळे उत्तम काम होत नव्हते. राज्य शासनाकडे मागणी केल्यानंतर सहकार कायद्यात सुधारणा झाली आहे. सचिव यंत्रणा सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे अध्यक्षांनी स्पष्ट केले.

*१००% वसुली करणाऱ्या ३४ संस्थांचा सत्कार*

यावेळी दि. ३० जून २०२६ अखेर बँकेच्या कर्जाची *१००% वसुली* करणाऱ्या *३४ विकास संस्थांचा* अध्यक्ष मनीष दळवी, संचालक विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मोर्ये, आत्माराम ओटवणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

*सत्कारप्राप्त संस्था* : तेंडोली, माणगाव, कर्याद नारूर, नेरूर, आंदुर्ले, घोटगे, निवजे, पाट, कुडाळ पंचक्रोशी, पणदूर वेताळ बांबार्डे, कडावल, माड्याची वाडी, श्री लिंगेश्वर सोनवडे, कसाल, हिर्लोक, सरंबळ, हुमरमळा, झाराप, डिगस आकेरी, बांबुळी, तुळसुली, चेंदवण, वालावल कृषी संघ, श्री महादेव कवठी, घावनळे, वालावल, वाडी वरवडे, साळगाव, केरवडे, पांग्रड, आवळेगाव इ. 

*वाडी वरवडे विकास संस्थेचा* संस्था स्तरावर १००% वसुलीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

मेळाव्यास संचालक विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मोर्ये, आत्माराम ओटवणेकर, रविंद्र मडगांवकर, चंद्रकांत माधव, भा.के. वारंग, दिपक नारकर, कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, बाबा गावडे, के. बी. वरक, वसंत हडकर, शाम सरमळकर, निलेश कनयाळकर, संजय परब आदी उपस्थित होते. कुडाळ तालुक्याच्या वतीने अध्यक्ष मनीष दळवी यांचा सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!