देशभरातून सुमारे ८५० खेळाडू होणार सहभागी- रणजीत देसाई
कुडाळ | प्रतिनिधी
१० व्या कुडाळदेशकर प्रीमियर लीग (केपीएल) २०२५ या क्रीडामहोत्सवाचे कुडाळ येथे दि. ७, ८ व ९ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले असून देशभरातून सुमारे ८५० खेळाडूंनी नाव नोंदणी केली असून सुमारे १३०० ते १४०० ज्ञाती बांधव या महोत्सवात सहभागी होणार आहेत. या क्रीडा महोत्सवा बरोबरच ज्ञाती बांधवांचे सांस्कृतिक कार्यक्रम, कला प्रदर्शन यांचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे अध्यक्ष अध्यक्ष रणजीत देसाई यांनी दिली.
कुडाळ मराठा समाज सभागृहात या महोत्सवाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महोत्सवाचे महोत्सव अध्यक्ष रणजीत देसाई, क्रीडा संघटक मनीष दाभोलकर, केदार सामंत, प्रशांत धोंड, प्रफुल्ल वालावलकर, अतुल सामंत, रोहन देसाई, मनोज वालावलकर, अभय सामंत, गुरु देसाई, सचिन देसाई, तृप्ती प्रभू देसाई, विपुल प्रभू, श्रीकृष्ण सामंत, साहिल देसाई, सागर नाईक, मनोज तेंडुलकर विकास वाघ आदी उपस्थित होते.
यावेळी रणजीत देसाई यांनी सांगितले की, समाज ऐक्याची नवीन व अभिनव दृष्टी प्राप्त करून देण्यासाठी ‘गौड ब्राह्मण सभा ही समाजसेवी ज्ञातीसंस्था १८९७ साली गिरगावात १२८ वर्षा पूर्वी स्थापन झाली. पूर्वजांचे विचार व संस्कार नव्या पिढीपर्यंत डोळसपणे पोहोचवणे त्यांना एकत्र आणणे, बंधुता, एकता व विश्वास निर्माण करणे, वधू-वर सभा-संमेलने, इत्यादी मेळावे भरवून अंगीभूत कलागुणांना वाव देणे. कलाकारांचा, विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांचा उचित आदर सन्मान करणे, गरीब, गरजू, होतकरू, मुला-मुलींना शिष्यवृत्ती देणे, पारितोषिके देऊन गौरविणे निराधार, निराश्रित महिला-पुरुष, कर्करोग, हृदयविकार, मतिमंद आदि व्याधिग्रस्त यांना वैद्यकीय सहाय्य, कन्यादान निधी वाटप व ‘गौड ब्राह्मण त्रैमासिक प्रकाशित करणे जे गेली ८७ वर्षे अविरत सुरू आहे.
गौड ब्राह्मण सभा व कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण सभा या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून तरुण पिढीसाठी क्रीडा महोत्सव (केपीएल) ची सुरुवात २०१६ साली गोरेगाव येथून झाली. त्यानंतर पनवेल २०१७, कुडाळ २०१८, गोवा २०१९, डोंबिवली २०२०, कुडाळ २०२१, दापोली रत्नागिरी २०२२, मंगलोर २०२३, पुणे २०२४ व आता १० वा क्रीडा महोत्सव कुडाळ हायस्कूल व बॅ. नाथ पै. कॉलेज, कुडाळ येथे ७, ८ व ९ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. यात मंगलोर, गोवा, विरार, पुणे, सिंधुदुर्ग, पनवेल, मुंबई, डोंबिवली, कोल्हापूर, बेळगाव हून ३४ पुरुष क्रिकेट संघ व १२ महिला क्रिकेट संघ सामील होत आहेत. तसेच २५० कॅरम, १५० बॅडमिंटन, १६० बुद्धिबळ, तसेच कलादालन, रांगोळी व निबंध स्पर्धेकरिता अनेक खेळाडूंनी भारतातून सहभाग नोंदवला आहे.
कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग संस्था यांनी १०वा क्रीडा महोत्सव केपीएल २०२५ कुडाळमध्ये आयोजन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग स्थापन झाल्यापासून विविध समाजोपयोगी उपक्रम यामध्ये वधूवर संमेलन, कला, गायन व नृत्य, मालवणी नाटक, दशावतार, विद्यार्थी कौतुक सोहळा इत्यादि तसेच अनेक प्रकारे गरजूंना मदत करीत आहे. कला-क्रीडा कौशल्य विकास व्हावा इंटरनेट, समाज माध्यम, काल्पनिक विश्वातून लहान मुलांनी बाहेर पडून माती-मैदानाशी नाळ जोडावी तसेच हा क्रीडा महोत्सव फक्त तरुणांचाच नसून यामध्ये संपूर्ण कुटुंबच भाग घेते. आजी-आजोबा, सासू-सुना, नातू-नात्तवंडे, आई-बाबा सर्व भारतातील ज्ञातीबांधव एकत्र येऊन सहभागी होतात. हे या क्रीडा महोत्सवाचे वैशिष्ठ आहे. मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, बेळगाव, गोवा, मणिपाल, बंगलोर, मंगलोर, उडुपी येथील युवा पिढीने मोठ्या प्रमाणात विविध खेळांमध्ये सहभाग नोंदवला आहे.
कुडाळदेशकर प्रीमियर लीग (केपीएल) २०२५ मध्ये १०व्या वर्षी १० खेळ त्यात मुख्यत्वे क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, रांगोळी, बुद्धिबळ, निबंध स्पर्धा, धावणे, चमचा लिंबू, बेडूक उड्या व फॅन्सि ड्रेस खेळविले जातील.
प्रथमच कुडाळ येथे कलादालन प्रदर्शन- रणजित देसाई
प्रथमच समाजातील कलाकारांचे राष्ट्रीय स्तरावरचे कला प्रदर्शन आयोजन कुडाळ येथे कला दालना मध्ये आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ चित्रकार अरुण दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बि. जि. सामंत उपस्थित राहून कलादालनाची आखणी करणार आहेत. ज्यात चित्रकला, शिल्पकला व हस्तकला सादर केली जाईल. या कलादालना तील कला कृतीचा आस्वाद जिल्ह्यातील विद्यार्थी कला रसीक यांनी घ्यावा असे देसाई यांनी यावेळी सांगितले.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्यावसायिक व स्थानिक कलाकारांकडून ७ व ८ नोव्हेंबर रोजी सायं. ठीक ७:०० वा. “पु. ल. देशपांडे रंगमंच, बॅ. नाथ पै. संकुल” येथे सबकुछ कुडाळदेशकर असा सांस्कृतिक कार्यक्रम व कुडाळदेशकर ज्ञातीबांधव यांनी बसविलेले दशावतारी नाटक सादरीकरण होणार आहे. त्यानंतर प्रीती भोजन होईल.
१० व्या क्रीडा महोत्सवाचे प्रमुख पाहुणे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, रणजीत देसाई, जगदीश वालावलकर, मनीष दाभोलकर, कर्नाटक संस्था अध्यक्ष महेश ठाकुर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ७.३० वाजता उद्घाटन सोहळा सुरू होईल. त्यात मशाल, शपथविधी, सत्कार, शुभेच्छा पर भाषण त्यानंतर क्रिकेट व इतर खेळांचे सामने सुरु होतील तर रविवार ९ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना ठीक दुपारी २:३० वाजता व नंतर बक्षीस समारंभ सुरू होईल. या दोन्ही कार्यक्रमास समाजातील प्रतिष्ठित मान्यवर, क्रीडा जगतातील खेळाडू, उद्योजक व पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
के पी एल च्या गेल्या नऊ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात देशभरातून सुमारे साडेआठशे खेळाडू तसेच देशभरातून इतर संस्थांचे प्रतिनिधी मिळून सुमारे 1300 ते 1400 लोकांनी नाव नोंदणी केलेली आहे याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे कुडाळेश्वर ज्ञातीबांधव ही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यामुळे ज्ञातीबांधवाचा हा स्नेह मेळावा पार पडणार आहे.
दि. ७ नोव्हें. रोजी कुडाळदेशकर ज्ञातीबांधव यांच्या भारतात 27 संस्था आहेत त्या संस्थांचे प्रतिनिधी यांची बैठक, गेल्या दहा वर्षात जो किती वेळ केपीएल महोत्सव भरवण्यात आला, त्याबद्दल आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील वाटचाल कशी असेल या संदर्भातील चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे असे देसाई यांनी सांगितले.
यावेळी क्रीडा संघटक मनिष दाभोलकर यांनी सांगितले की, गौड ब्राह्मण सभा या संस्थेने तीन शतक पाहिली असून समाज एकत्रित येईल या करिता नेहमी विविध उपक्रम राबविले, प्रयत्न केले. केपीएल हा क्रीडा महोत्सव गेली नववर्ष आयोजित करण्यात येत असून यापूर्वी दोन वेळा सिंधुदुर्गच्या संस्थेने आयोजन केले होते. आता तिसऱ्या वेळी या दशपूर्ती सोहळ्याचे आयोजन सुंदररित्या केले आहे असे त्यांनी सांगितले.


