आपलं ध्येय गाठण्यासाठी कष्टाची जोड असेल तर ते ध्येय निश्चित पूर्ण होते..!!
कुडाळ | प्रतिनिधी
आपलं ध्येय गाठण्यासाठी कष्टाची जोड असेल तर ते ध्येय निश्चित पूर्ण होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे पिंगुळी शेटकरवाडी येथील गोपाळ सावंत याने ऑल इंडिया पोलीस भरतीमध्ये मिळवलेले यश म्हणावे लागेल या यशाला आईच्या कष्टाची ही सोनेरी झालर असल्यामुळे हे यश जग जिंकल्यासारखेच गोपाळ सावंत साठी आहे ऑल इंडिया पोलीस भरतीमध्ये त्याची निवड झाल्यावर रस्त्यावर बसून भाजी विकणाऱ्या आईचा आशीर्वाद त्याने घेतला त्यावेळी माय लेकाचे आनंदाश्रू आवरले नाहीत. हा मायलेकाचा व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाला आणि सर्वांनी कौतुक केले.
कोणत्याही कष्टाचे फळ हे चांगलेच मिळते पण ते कष्ट प्रामाणिक आणि आपले ध्येय गाठण्यासाठी असले पाहिजे पिंगुळी शेठकरवाडी येथील गोपाळ सावंत या युवकाची अशीच गोष्ट आहे. या सावंत कुटुंबीयांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच सुरू होता. आई वडील आणि त्यांची दोन मुले मिळून शेती करतात पण गेली पाच वर्ष त्यांचे वडील आजारी असल्यामुळे आई सोबत गोपाळ व त्याचा लहान भाऊ याने शेतीमध्ये काम करून शिक्षण घेतले. गोपाळ सावंत यांचे शिक्षण पदवी पर्यंत झाले त्यानंतर त्याने ऑल इंडिया पोलीस भरतीमध्ये तीन वेळा प्रयत्न केले तिसऱ्या वेळी त्याला हे यश आले आहे यामध्ये गोवा येथे त्याची लेखी परीक्षा झाली आणि पुणे येथे मैदानी परीक्षा झाली त्याचा निकाल लागला आणि तो ऑल इंडिया पोलीस मध्ये भरती झाला पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचे कष्ट आईचे कष्ट महत्वाचे आहेत.
वडील घरी आजारी पडल्यापासून गोपाळ सावंत व त्याचा भाऊ आई सोबत शेती करतात त्यांची आई कुडाळ नगरपंचायत जवळ रस्त्यालगत बसून ऊन, पावसामध्ये आपल्या शेतात केलेली भाजी विकण्याचे काम करते. शेतकरी कुटुंबातील या युवकाने भरतीमध्ये मिळवलेले यश जग जिंकल्यासारखे आहे.
आईचा आनंद गगनात मावेना
ऑल इंडिया पोलीस भरतीमध्ये निवड झाल्यावर गोपाळ सावंत यांनी ज्या ठिकाणी आपली आई भाजी विकत होती त्या ठिकाणी येऊन तिचे पाय धरले आणि आशीर्वाद घेतले या कुटुंबीयांचा हा आनंदाचा क्षण सगळ्यांनीच अनुभवला माय लेकाच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू दरवळले. आणि हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला सर्वांनीच त्यांचे कौतुक केले.


