कुडाळ 2
कुडाळ शहराच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या सूचना व हरकती गांभीर्याने घेण्यात येत असून कोणावरही अन्याय होईल असा निर्णय घेतला जाणार नाही, अशी ग्वाही नगराध्यक्षा प्राजक्ता अशोक बांदेकर यांनी दिला आहे.
प्रारूप विकास आराखडा हा शहराच्या आगामी विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असून या प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सहभाग आणि विश्वास हेच नगरपंचायतीचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरपंचायत प्रशासनाने जाहीर प्रकटनाद्वारे तसेच शहरातील प्रत्येक वॉर्डातील प्रमुख चौकांमध्ये प्रारूप आराखड्याची माहिती प्रदर्शित केली आहे.
हरकती स्वीकारणे सुरू:
सध्या नागरिकांच्या हरकती व सूचना नियमानुसार स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. नगरपंचायत कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या हरकती व्यवस्थित नोंदवून घेतल्या जात असून शंकांचे निरसन प्रशासनाकडून केले जात आहे.
पारदर्शक प्रक्रिया:
प्रारूप विकास आराखड्याबाबत कोणतीही घाई, बळजबरी अथवा कोणत्याही नागरिकांवर अन्याय होईल अशा प्रकारे कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. सर्व नागरिकांच्या सूचना, हरकती आणि मतांचा कायद्यानुसार व वस्तुनिष्ठपणे विचार करूनच पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
अफवांवर विश्वास नको:
नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा गैरसमजांना बळी न पडता, अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा व आपल्या सूचना व हरकती नियोजित मुदतीत नगरपंचायतीकडे सादर कराव्यात, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.नगराध्यक्ष म्हणून प्रत्येक नागरिकाच्या न्याय्य हिताचे पूर्ण संरक्षण केले जाईल आणि सर्व प्रक्रिया पारदर्शक, कायदेशीर व लोकाभिमुख पद्धतीनेच राबविली जाईल, अशी ग्वाही श्रीमती बांदेकर यांनी दिली आहे.


