*'”शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास हाच यशाचा राजमार्ग “‘*
* जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांचे आवाहन*
*विद्यार्थ्यांच्या गुणांचे झाले कौतुक, जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
*सावंतवाडी:*
कोणतेही यश मिळवायचे झाले तर प्रामाणिकपणा आणि मेहनत अधिक महत्त्वाची असते. आज तुम्ही ज्या वर्गात बसला आहात, त्याच वर्गात कधीकाळी मीही बसलो होतो. म्हणून मी खात्रीने सांगतो.तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थी मोठे यश मिळवू शकतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्ने पाहा, वेळेची बंधने पाळा. स्वतःमधील आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नका. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा सिंधू दर्पण पत्रकार गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन संतोष राऊळ यांनी केले.
कलंबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त येथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षा २०२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘विद्यार्थी गुणगौरव समारंभ’ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या परीक्षेत आपल्या कौतुकास्पद कामगिरीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या कुमारी माधुरी महेश राऊळ, सानवी नीलकंठ गुरव आणि कुमारी सानिका ज्ञानदेव राऊळ या प्रमुख तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
या दिमाखदार सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व विद्येची देवता सरस्वती मातेच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करत मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर प्रमुख अतिथी संतोष राऊळ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री. राऊळ भावुक झाले आणि त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. “मी याच शाळेत शिकलो आणि आज इथपर्यंत पोहोचलो, याचे सर्व श्रेय माझ्या शिक्षकांना आणि या शाळेला जाते,” असे सांगताना ते म्हणाले की, कधीकाळी मी विद्यार्थी असताना तुमच्यासारखाच शेवटच्या बेंचवर बसायचो. परिस्थिती गरीब होती, मात्र मनात ध्येय गाठायची जिद्द आणि चिकाटी होती. खेडेगावातील विद्यार्थी कणखर असतो आणि त्याला गरिबीची जाणीव असते. त्यामुळे आपल्या आई-वडिलांचे कष्ट लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने वाटचाल केली पाहिजे.
आजच्या मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी ‘वाचाल तर वाचाल’ असा संदेश दिला. व्यक्तिमत्व विकासासाठी थोर व्यक्तींची पुस्तके, कादंबऱ्या वाचणे गरजेचे असून अभ्यासासोबतच खेळ आणि वाचनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या जडणघडणी बद्दल बोलताना त्यांनी इतिहास विषयाचे शिक्षक कै. धोंड सर यांचे विशेष आभार मानले. धोंड सरांनी लावलेल्या वाचन आणि लेखनाच्या सवयीमुळेच आज आपण कोणत्याही विषयावर उत्तम प्रकारे लिहू शकतो, अशा शब्दांत पत्रकार संतोष राऊळ यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक यशाचा योग्य सन्मान करून त्यांना पुढील उच्च शिक्षणाच्या वाटचालीसाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजित जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. या संस्था पदाधिकाऱ्यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
या सोहळ्याला संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत, सचिव यशवंत राऊळ, सहसचिव चंद्रकांत राणे, शाळेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, संचालक शशिकांत धोंड, सूर्यकांत राजगे, वसंत सावंत, कलंबिस्त गावचे माजी सरपंच ,माजी शिक्षक शरद नाईक, सांगली केंद्रप्रमुख अवधूत जाधव, निवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी रामचंद्र सावंत, माजी विद्यार्थी राजेश गोवेकर, जयेंद्र राऊळ यांच्यासह शिक्षक शरद सावंत, धनराज सदगुरे, विनिता कविटकर,प्रकाश पावरा, चैताली राऊळ, रविकांत सावंत, संजना तायशेटे व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी केले, तर आभार विलास चव्हाण यांनी मानले.


