Monday, August 31, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळ२ कोटी ३७ लाखाची व्हेल माशाची उलटी जप्त

२ कोटी ३७ लाखाची व्हेल माशाची उलटी जप्त

पणदूर – कुडाळला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची मोठी कारवाई

 

चार संशयित तरुणांना 2 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

 

कुडाळ | प्रतिनिधी

प्रतिबंधित व्हेल माशाच्या उलटी (अंबरग्रीस) ची तस्करी करणाऱ्या टोळीचा सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. या शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे सापळा रचत ही मोठी कारवाई करीत २ किलो ३७३ ग्रॅम वजनाची २ कोटी ३७ लाख ३० हजार रु. किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त केली. तस्करीसाठी वापरण्यात आलेली एक कार व एका मोटारसायकलसह चार तरुणांना ताब्यात घेतले.या कारवाईत एकूण सुमारे २ कोटी ४६ लाख रु.चा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या चारही तरुणांना न्यायालयात हजर केले असता २ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

शनिवारी सायंकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर होते. काही व्यक्ती प्रतिबंधित अंबरग्रीसची विक्री करण्यासाठी तस्करी करणार असल्याची विश्वसनीय माहिती या पथकाला मिळाली.याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन पंच व वनरक्षक यांच्या उपस्थितीत पणदूर ते कडावल जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत कुलस्वामिनी एंटरप्रायझेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या कार्यालयाच्या बाजूला या पथकाने सापळा रचला.होंडा युनिकॉर्न मोटारसायकल तसेच मारुती सुझुकी एर्टिगा कार आढळली. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफीने कारवाई करत या वाहनातून आलेल्या चार जणांना ताब्यात घेतले. संकेत संतोष चव्हाण ( २६, सध्या रा. ओरोस- रवळनाथनगर, मूळ रा. निरूखे, ता. कुडाळ), महेश लक्ष्मण रेवणकर ( ३५, सध्या रा. रत्नागिरी -कुवारबाव, मूळ रा. रेवंडी, मालवण), अमेय पुंडलिक देसाई ( ३१, रा. ओरोस – रवळनाथनगर, ता.कुडाळ) व अमित अरुण अणावकर (३९, रा. अणाव, ता. कुडाळ) अशी या चार संशयीताची नावे आहेत.

पोलिसांनी केलेल्या तपासणीत या संशयितांकडे २ किलो ३७३ ग्रॅम वजनाचा अंबरग्रीस विक्रीच्या उद्देशाने ताब्यात असल्याचे आढळले. तसेच अंबरग्रीस व दोन्ही वाहने असा एकूण २ कोटी ४६ लाख रु.चा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि परि.विभागीय पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सनील पाटील, उपनिरीक्षक अनिल हाडळ उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार विल्सन डिसोजा, आशिष जामदार व अमर कांडर यांच्या पथकाने केली. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ मधील कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८ व ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या गुन्ह्याचा तपास कुडाळचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे करीत आहेत वन्यजीवांच्या अवयवांची बेकायदेशीर विक्री व तस्करी रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत. फोटो पणदूर – व्हेल माशाच्या उलटी तस्करी गुन्ह्यातील चार संशयीतासमवेत सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे अधिकारी – कर्मचारी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!