कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालय चौक ते एमआयडीसी चौकापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या चौपदरीकरणांमध्ये आलेले स्टॉल हटविण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहे.
एमआयडीसी विभागाच्या ताब्यात असलेला संत राऊळ महाराज महाविद्यालय चौक ते हॉटेल अभिमन्यू पर्यंतचा रस्ता आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेला अभिमन्यू हॉटेल ते एमआयडीसी चौकापर्यंतचा रस्ता चौपदरीकरण करण्यात येणार आहे या रस्त्याचे काम मंजूर झाल्यानंतर रस्त्यालगत असलेली झाडे तोडण्यासाठी वनविभाग तसेच नगरपंचायतीची परवानगी घेण्यात आली. आता या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. चौपदरीकरण मध्ये येणाऱ्या भागाचे सपाटीकरण सुरू करण्यात आले आहे. २० मीटर रस्ता रुंद होणार असून या रुंदीकरणाची मोजणी लवकरच होणार आहे. त्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. यामध्ये महामार्ग प्रमाणे रस्ता बनविण्यात येणार असून दुभाजक सुद्धा असणार आहे.
