कुडाळ | प्रतिनिधी
कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः विद्यार्थिनींमध्ये विशेष गुणवत्ता आढळून येते. मात्र स्पर्धापरीक्षामधून प्रशासकीय सेवेमध्ये येण्यासाठी फारशी उत्सुकता आणि तयारी दिसून येत नाही. विद्यार्थिनींनी या संदर्भातील संधींचा लाभ घेऊन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम बनवले पाहिजे यासाठी महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्ती यासारख्या कार्यशाळा आवश्यक आहेत असे प्रतिपादन कुडाळचे तहसीलदार डॉ. वीरसिंह वसावे यांनी केले. संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये आयोजित एक दिवसीय महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्ती या विषयावरील कार्यशाळेत उद्घाटक नात्याने ते बोलत होते.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या वतीने संत महाराज महाविद्यालयातील महिला विकास कक्ष राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग, आणि आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ए.एन. लोखंडे यांनी अध्यक्षपद भूषविले. या प्रसंगी कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सहकार्यवाह श्री महेंद्र गवस यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट नीलांगी ताई रांगणेकर, पोलीस अंमलदार श्रीमती ऋतुजा परब आणि समतादूत सगुण जाधव उपस्थित होते सुरुवातीला उद्घाटक मा तहसीलदार डॉ. वीरसिंह वसावे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन झाले. कार्यशाळेमध्ये विशाखा मार्गदर्शक तत्वे या विषयावर ऍड.नीलांगी रांगणेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या विशाखा मार्गदर्शक तत्वांचे त्यांनी सविस्तर विवेचन केले. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना या जजमेंट मध्ये सुचवल्या गेल्या आहेत. त्यानुसार सर्व संस्था आणि कार्यालयामधून महिला विषयक सुरक्षिततेसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात यावेत असे या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. या संदर्भातील आपल्या अनुभवांचेही त्यांनी उदाहरणासहित विवेचन केले. महिलांविषयी अनेक प्रभावी असे कायदे केले असले तरी त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यासारख्या कार्यशाळा आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या.
पोलीस अंमलदार श्रीमती ऋतुजा परब यांनी पोलीस विभागाकडून महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजना विषयीची माहिती दिली . मुलींनी मोबाईलचा वापर करताना विशेष दक्षता घ्यावी. तसेच कोणावरही चटकन विश्वास ठेवू नये, मैत्री करताना मर्यादा ओलांडू नये, नेहमी सजग राहावे असे आवाहन केले. महिला सुरक्षिततेबरोबरच या कार्यशाळेमध्ये शिष्यवृत्ती विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
समतादूत श्री सगुण जाधव यांनी सारथी महाज्योती ,राजर्षी शाहू शिष्यवृत्ती इत्यादी विषयी सविस्तर माहिती दिली. विविध शासकीय शिष्यवृत्ती योजनांद्वारे विद्यार्थी आपले भवितव्य उज्वल घडवू शकतात असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यशाळेचे
अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ए.एन लोखंडे यांनी भूषविले. प्रस्ताविक महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ.शरयू आसोलकर यांनी केले पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत कॅप्टन डॉ.एस.टी. आवटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रज्ञा सावंत यांनी केले. आभार प्रा. काजल मातोंडकर यांनी मानले.
या कार्यशाळेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा.उमेश कामत, प्रा. भावेश चव्हाण, आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे समन्वयक डॉ.दीपक चव्हाण ,प्रा. सुवर्णा निकम प्रा.सोनाली अंगचेकर, कार्यालयीन अधीक्षक श्री.संगम कदम यांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेला प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
