Saturday, June 20, 2026
Google search engine
Homeलेखकांदळगावच्या धडपडीची टेलिव्हिजन स्क्रीनने घेतलेली दखल - सुनील कदम

कांदळगावच्या धडपडीची टेलिव्हिजन स्क्रीनने घेतलेली दखल – सुनील कदम

“गेले भजनाक पोचले लग्नाक” नाटकाचा प्रयोग संपला आणि मी सरळ रंगपटात गेलो. समोर उभा होता तो गोंधळलेला भिकू. रंगमंचावर ज्याच्या “येतोय गो…” या एका हाकेने प्रेक्षकांना हसवून हसवून वेडं केलं होतं, तो कलावंत म्हणजे कांदळगावचा सुनील कदम.

मी त्याला कडकडून मिठी मारली. खरं सांगायचं तर त्या क्षणी मला त्याचं अभिनंदन करायचं नव्हतं, तर त्याच्यावर प्रेम व्यक्त करायचं होतं. कारण रंगमंचावर उभा असलेला तो तुफानी कलाकार माझ्या डोळ्यांसमोर पंधरा-वीस वर्षांपूर्वीचा एक तरुण घेऊन आला होता.

सुनील फक्त एवढाच म्हणाला…

“दादा, तुम्ही ऑपरेशन रामजन्मभूमीमध्ये संधी दिली नसती तर आज ही मिठी मला मिळाली नसती.”

आणि मी क्षणात २००३ सालात पोहोचलो.

कॉलेजमध्ये शिकणारा, अभिनयाची ओढ असलेला पण अनुभव नसलेला एक मुलगा “ऑपरेशन रामजन्मभूमी” या स्किटमध्ये सहभागी झाला. त्यावेळी त्याला पहिला दिग्दर्शक म्हणून मी लाभलो, सोबत श्रीकांत देसाई आणि प्रफुल्ल देसाई यांचं मार्गदर्शन होतं. त्या छोट्याशा स्किटने त्याच्या आयुष्याची दिशा बदलली.

त्याच स्किटमुळे त्याला पहिल्यांदा चर्चगेटच्या रंगमंचावर उभं राहण्याची संधी मिळाली. तिथून हेमंत कदम, राजू कदम, सचिन टिकम, रघुनाथ कदम अशा दिग्दर्शक मंडळीमुळे त्याला करियरचा खरा ग्राफ मिळाला…

त्या स्पर्धेची एक आठवण तो आजही सांगतो. सभागृहात विविध महाविद्यालयांची मुलं बसली होती. समोर एक चेहरा दिसला. कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला. अचानक लक्षात आलं— “तीन तेरा पिंपळझाडं” मालिकेतला सिद्धार्थ जाधव!

समोर बसलेला सिद्धार्थ जाधव आणि त्याच्याकडे आश्चर्याने पाहणारा सुनील. दोघांच्या चेहऱ्यावर उमटलेलं एक स्मित. अभिनयविश्वाशी झालेला तो पहिला जवळचा परिचय होता. त्या स्पर्धेचे परीक्षक होते पॅडी कांबळी.

कॉलेज संपलं आणि अनेकांच्या आयुष्यात जसं होतं तसं सुनीलच्या आयुष्यातही झालं. रंगमंच दूर गेला. जबाबदाऱ्या जवळ आल्या.

पण ज्याच्या रक्तात कला असते, तो रंगभूमीपासून किती दिवस दूर राहणार?

२००९ मध्ये मामासाहेब वरेरकर नाट्यगृहात एका कार्यक्रमासाठी हेमंत कदम अर्थात पिंटूने गावातील मुलांचा नृत्याविष्कार बसवला. “आयचा घोव” या गाण्यावर सुनीलने केलेला नाच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

आणि तिथून त्याची पावलं वळली कलांकुर दिशेने.

सचिन टिकमच्या घरी तो फक्त नृत्यासाठी गेला होता. “लख लख चंदेरी” या गाण्यावर त्याने पहिला नृत्याविष्कार केला. पण सचिन टिकमला त्या मुलातला अभिनेता दिसला होता.

प्रवीण तरडे लिखित आणि राज बोडके दिग्दर्शित “सालं एकदा तरी” या एकांकिकेत सुनीलला भूमिका मिळाली. स्पर्धेच्या रंगमंचाची धडधड, पडद्यामागची धावपळ, जिंकण्याची आस आणि प्रेक्षकांची दाद त्याने पहिल्यांदा अनुभवली.

विशेष म्हणजे त्याला त्या स्पर्धेत विनोदी अभिनयाचं पारितोषिक मिळालं.

पण कला पोट भरत नाही. म्हणून हा कलाकार मजुरी करू लागला. कधी शेतीत, कधी सेंट्रिंगच्या कामावर, तर कधी बागेत. दिवसा कष्ट आणि रात्री रंगभूमी.

कारण त्याला कळलं होतं…

“अभिनय आनंद देतो, पण संसार चालवण्यासाठी पैसा लागतो.”

सचिन आणि शुभदा टिकम यांनी त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे कलांकुरमध्ये त्याचा प्रवास सुरू राहिला. “हाऊसफुल्ल”, “क ला काना का”, “ईश्वर अल्ला तेरो नाम” अशा अनेक गाजलेल्या एकांकिकांमध्ये त्याने लक्षवेधी भूमिका केल्या.

आणि मग भेट झाली रघुनाथ कदमांची.

“गेले भजनाक पोचले लग्नाक” या नाटकाने सुनीलच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू केला. रघुनाथ कदम हे त्याचे केवळ दिग्दर्शक राहिले नाहीत, तर जिवाभावाचे मित्र बनले.

आजही सुनील बोलताना भावुक होतो.

“रघु काका आज या जगात नसले तरी ते माझ्यासोबतच आहेत असं वाटतं.”

त्यांच्या मार्गदर्शनाखाली “गेले भजनाक पोचले लग्नाक”, “भानगडीचो गाव देवा माका पाव”, “गजालीन खाल्लो घोव”, “प्रेमाचा झनगडगुत्ता”, “अधांतर” यांसारख्या नाटकांत त्याने विविधांगी भूमिका साकारल्या.

मुंबईत नोकरी करत असताना देखील तो प्रयोगांसाठी धावत गावाकडे येत राहिला. विशेष म्हणजे प्रयोगाच्या दिवशी तो कधीच पोहोचत नाही. एक-दोन दिवस आधीच येऊन तयारीत झोकून देतो.

कलाक्षेत्राबरोबरच त्याने लघुपटांतही काम केलं. किरण कदम आणि हेमंत कदम यांच्या “गुलाम” या लघुपटात तसेच वॉल्टर डिसोझाच्या “पिस्सो पास्कल पिंटो”मध्ये त्याने अभिनय केला.

रंगमंचावरील त्याचा अभिनय पाहून राजा दळवी यांनी त्याला दूरचित्रवाणीच्या दिशेने नेलं. निर्माता सुनील भोसले यांची भेट घडवून आणली. ऑडिशन झाल्या आणि सुनीलला “वेतोबा” मालिकेत काम मिळालं.

क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मालिकेमुळे हा कलाकार महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला.

मालिका संपली, पण संघर्ष संपला नाही. तो पुन्हा आपल्या नोकरीकडे वळला. वॉर्ड बॉय म्हणून काम करत असताना रुग्णांच्या डोळ्यातील वेदना समजून घेत राहिला आणि अभिनयाची ज्योतही जिवंत ठेवली.

त्याच्या आयुष्यातील सर्वात भावनिक गोष्ट मात्र वेगळीच आहे.

सुनील अवघा सहा महिन्यांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्या काळी प्रत्येक घरात कॅमेरे नव्हते. त्यामुळे आजही त्याने आपल्या वडिलांचा फोटो पाहिलेला नाही.

वडिलांचं प्रेम काय असतं हे ज्याला अनुभवता आलं नाही, तो जेव्हा रंगमंचावर बापाची भूमिका करतो, तेव्हा त्याच्या अभिनयातली वेदना खरी असते.

कदाचित म्हणूनच त्याच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करतात.

कलांकुर परिवाराने त्याचा पंचविसावा वाढदिवस साजरा केला, तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच त्याने केक कापला होता. हा प्रसंग तो आजही विसरू शकत नाही.

सुनील तसा प्रसिद्ध झाला लॉकडाऊनमध्ये, जेव्हा त्याला मुंबईकर म्हणून शाळेत क्वारंटाईन केलं तेव्हा त्याच्या बंदीवान जगात त्याने केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम फेसबुकवरन अख्या जगभर व्हायरल झाले, सुनीलच्या त्या परफॉर्मन्सने अनेकांना हसणे परत आठवले होते, हे ही विशेष !!

आज सुनील कदम यशाच्या वाटेवर आहे. मालिका, नाटकं, लघुपट, पुरस्कार, लोकप्रियता हे सगळं त्याला मिळालं आहे. पण अजूनही तो तेवढाच जमिनीवर आहे.

कारण त्याला माहिती आहे की कलाकार मोठा होतो तो टाळ्यांनी नाही, तर त्याच्या संघर्षाने.

आणि म्हणूनच आजही जेव्हा रंगमंचावर “भिकू”ची एन्ट्री होते, तेव्हा प्रेक्षक हसतात, दाद देतात; पण मला मात्र त्या गोंधळलेल्या भिकूमध्ये २००३ सालचा एक स्वप्नाळू मुलगा दिसतो…

जो अजूनही रंगमंचावर उभा राहून आपल्या कलेवर मनापासून प्रेम करतो.

आणि त्या प्रेमाचं नाव आहे…

सुनील कदम!

– ऋषी श्रीकांत देसाई

#नाटक मंडळी

(सुनील कदम – 73507 43145)

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!