Wednesday, July 1, 2026
Google search engine
Homeकृषी वार्ताकृषी विभाग व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी...

कृषी विभाग व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन 

शेती हा केवळ पारंपरिक व्यवसाय नसून आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी जोडलेली मोठी उद्योगसाखळी आहे -सिंधुदुर्ग जिल्हा परीषद अध्यक्ष प्रमोद कामत

कुडाळ : प्रतिनिधी

     शेती हा केवळ पारंपरिक व्यवसाय नसून आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी जोडलेली मोठी उद्योगसाखळी आहे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीचा स्वीकार केल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे युवकांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून कृषी क्षेत्रात नवे प्रयोग करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परीषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले. 

 कृषी विभाग व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषि दिन कार्यक्रमाच्या अनुषंगाने कुडाळ तालुक्यातील आंबडपाल येथील श्री भद्रकाली मंदिर शेजारील सभागृह, आंबडपाल येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. 

  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, दुग्धशाळा विकास समिती उपाध्यक्ष तुकाराम साईल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल कबनुरे-पुंड, वित्त व बांधकाम समिती सभापती संतोष साटविलकर, ‍शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, महिला व बाल विकास सभापती अनुराधा नारकर, समाज कल्याण समिती सभापती रुहिता तांबे, कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक व आंबडपालचे सरपंच महेश मेस्त्री उपस्थित होते. 

 कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, भगवान बलराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते माती व बीजपूजन देखील करण्यात आले.

 श्री कामत पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कृषी विकासात कै. वसंतराव नाईक यांनी दिलेले ऐतिहासिक योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी शेती क्षेत्रात अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. कै. वसंतराव नाईक यांनी आपल्या दूरदृष्टीतून शेतीला केवळ उदरनिर्वाहाचे साधन न मानता ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया म्हणून विकसित केले. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. ग्रामीण भागात कृषी सहायक महत्वाचा घटक असल्याने आता कृषी सहायकांना ग्रामपंचायत कार्यालयात बसण्यासाठी जागेची उपलब्धता करुन देण्यात येणार आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणे सोयीचे होणार आहे असेही ते म्हणाले. 

 मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खेबुडकर म्हणाले की, जिल्ह्यातील वापरात नसलेल्या जागेचे सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण पुर्ण होताच या जागा शेतीसाठी वापरात आणण्याचे नियोजन आहे. महिलांनी देखील शेतीकडे वळावे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

  मेळाव्यात कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती, आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, फळबाग विकास तसेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध विविध अनुदान योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी विषयक विविध प्रश्न उपस्थित करून तज्ज्ञांकडून त्यांचे निरसन करून घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!