सिंधुदुर्ग 4जुलै
जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या महिला व बालविकास समितीच्या सभापती सौ. अनुराधा नारकर यांनी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. आपल्या कार्यकाळात दरमहा शासन नियमानुसार मिळणारे 12,400/- रुपये मानधन न घेता ते थेट जिल्हा परिषद फंडात जमा करून महिलां व बालकांच्या कल्याणासाठी वापरण्याची मागणी त्यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बांधकाम) यांना दिलेल्या निवेदनात सौ. नारकर यांनी म्हटले आहे की, महिला व बालविकास समिती सभापती पदावर कार्यरत असताना शासन नियमानुसार घरभाडे धरून दरमहा 12,400/- रुपये मानधन मिळते. मात्र हे मानधन मी वैयक्तिक कारणासाठी न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी जिल्हा परिषद स्तरावर एक विशेष एकत्रित कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
मानधनाचा निधी फंडात जमा करण्याची मागणी
त्याअनुषंगाने आपले दरमहाचे मानधन न काढता सदरची सर्व रक्कम जिल्हा परिषदेच्या फंडात अर्थात जि.प. निधीमध्ये जमा करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच हा जमा झालेला एकत्रित निधी भविष्यात महिला व बालविकास विभागांतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष कार्यक्रमांसाठीच राखीव ठेवण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.या प्रस्तावावर आवश्यक ती प्रशासकीय व लेखा विषयक कार्यवाही करावी, अशी विनंती सौ. अनुराधा नारकर यांनी दिनांक 2जुलै2026 रोजी दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
सौ. नारकर यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


