Tuesday, July 7, 2026
Google search engine
Homeआपलं कोंकणसिंधुदुर्ग कारागृहात बंदीवानांसाठी योगसाधना शिबीर उत्साहात संपन्न  

सिंधुदुर्ग कारागृहात बंदीवानांसाठी योगसाधना शिबीर उत्साहात संपन्न  

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. डॉ सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शन 

आर्ट ऑफ लिव्हिंग कणकवली परिवाराचा पुढाकार 

 

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या सहकार्याने आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा कारागृह प्रशासन आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कणकवली शाखेतर्फे ओरोस येथील सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहात बंदीवानांसाठी आयोजित केलेल्या योगसाधना शिबिराची सांगता मोठ्या उत्साहात झाली. या शिबिरामध्ये कारागृहातले ३५ बंदिवान सहभागी झाले होते. सहभागी बंदीवानांनी सुद्धा योग शिबीर आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. 

    सिंधुदुर्ग जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या सहकार्याने आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कणकवली परिवाराच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहातील बंदीवानांसाठी आठ दिवसांचे योग आणि प्राणायाम शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याचा सांगता समारंभ रविवारी सकाळी कारागृहात झाला. या सांगता समारंभाला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सुर्यकांत इंदलकर यांच्यासह विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश श्री. देशिंगकर, दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर रविंद्र नडगदल्ली, विधिसेवा प्राधिकरणाच्या ऍड. उल्का पावसकर, कारागृह अधीक्षक सतीश कांबळे, योग प्रशिक्षक उमेश वायंगणकर आदी व्यासपीठावर यावेळी उपस्थित होते. 

     सुरुवातीला कारागृह अधीक्षक श्री. कांबळे यांनी योग शिबिरामागचा उद्देश प्रास्ताविकातून सांगितला. नंतर योग प्रशिक्षक उमेश वायंगणकर यांनी योग शिबिराबाबत माहिती दिली. सर्व बंदीवानांनी अगदी मनापासून योग शिबीर केल्याचे त्यांनी सांगून विधिसेवा प्राधिकरण आणि कारागृह प्रशासनाचे आभार मानले.

     यावेळी मार्गर्शन करताना न्यायाधीश सूर्यकांत इंदलकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. आपल्या धकाधकीच्या जीवनात योग साधना किती आवश्यक आहे हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी विधीसेवा प्राधिकरणाचे श्री. देशिंगकर यांनी सुद्धा आपल्या ओघवत्या शैलीत योगसाधनेचे महत्व सांगितले. योग साधनेत नेहमी सातत्य ठेवा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाच्या ऍड. उल्का पावसकर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग कणकवली परिवाराचे निलेश जोशी यांनी सुद्धा आपले विचार मांडले. 

    ज्यांच्यासाठी हे योग शिबीर आयोजित करण्यात आले होते त्या बंदीवानांनी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. सहा दिवसात खूप काही शिकता आले. मन शांत झाले. असे या बंदीवानांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त करताना सांगितले. प्रत्येक कारागृहात अशी योगसाधना शिबिरे सातत्याने आयोजित करावी अशी इच्छा या बंदिवानांनी प्रदर्शित केली. योग प्रशिक्षक उमेश वायंगणकर आणि कारागृह अधीक्षक श्री. कांबळे यांचे सर्व बंदीवानांनी विशेष आभार मानले. 

    यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग कणकवली परिवारातर्फे कारागृहातील बंदीवानांसाठी एफएम रेडिओ सेट आणि स्पीकर तसेच व्हॉलीबॉल भेट देण्यात आला. तसेच कारागृहाच्या वाचनालयासाठी बंदीवानांना पुस्तके सुद्धा वितरित करण्यात आली. 

    यावेळी आर्ट ऑफ परिवार कणकवलीचे योग प्रशिक्षक उमेश वायंगणकर, नंदकुमार आरोलकर, मोहन काणेकर, गायत्री मालवणकर, सुनील बाणे, मनोज म्हापसेकर, योगेश मुळे, सोनल मसुरकर, संजीवनी रेगे, निलेश जोशी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला कारागृह अधिकारी, कर्मचारी आणि योग शिबिरात सहभागी झालेले बंदिवान उपस्थित होते.

——————————-

फोटो १ – योग शिबिराच्या सांगता समारंभाप्रसंगी मार्गदर्शन करताना न्या. सूर्यकांत इंदलकर. बाजुला उमेश वायंगणकर, ऍड. उल्का पावसकर, न्या. रवींद्र नडगदल्ली, न्या. श्री. देशिंगकर.

फोटो 2 – आर्ट ऑफ लिव्हिंग कणकवली परिवाराच्या वतीने कारागृहाला स्पीकरसह एफएम रेडिओ सेट आणि पुस्तके प्रदान करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!