Saturday, August 29, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळगणेशोत्सवासाठी कुडाळ नगरपंचायत सज्ज. वाहतूक व विसर्जन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन.

गणेशोत्सवासाठी कुडाळ नगरपंचायत सज्ज. वाहतूक व विसर्जन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन.

नगरपंचात हद्दीतील 10 गणेशघाटांवर सुविधा, अवजड वाहनांना प्रवेशबंदी, पर्यायी मार्गाने वाहतूक, आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत

 

गणेशोत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, गणेश विसर्जन, आरोग्य सुविधा व आपत्ती व्यवस्थापन यासाठी कुडाळ नगरपंचायतीने व्यापक नियोजन केले आहे. याबाबत गुरुवार, दि. 27 ऑगस्ट, 2026 रोजी मा. नगराध्यक्ष श्रीमती. प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय बैठक घेण्यात आली. 

सदर बैठकीस मा. उपनगराध्यक्ष श्री. किरण शिंदे, मा. मुख्याधिकारी श्री. खंडू पवळ, मा. नगरसेवक श्री. विलास कुडाळकर, श्रीमती. नयना मांजरेकर, श्रीमती. श्रृती वर्दम, श्रीमती. आफरिन करोल, मा. नायब तहसिलदार श्री. संजय गवस, श्री. ईश्वर बामणे कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ, श्री. महेश निळकंठ उप कार्यकारी अभियंता, कुडाळ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. कुडाळ, श्री. विकास बडवे पोलिस निरीक्षक कुडाळ पोलीस ठाणे, श्री. संतोष साळसकर वाहुक विभाग कुडाळ, श्री. सुर्यकांत सावंत वनपाल कुडाळ, श्री. विनोद जाधव ग्रामीण रुग्णालय कुडाळ, श्री. रोहित नाईक आगार व्यवस्थापक कुडाळ, श्री. आर.एस. ढोवळे उप प्रादेशिक परिवहन विभाग, श्री. प्रसाद शिरसाट अध्यक्ष शहर व्यापारी संघटना, श्री. समिर दळवी डंपर चालक-मालक संघटना, श्री. महेंद्र वेंगुर्लेकर व श्री संजय मसुरकर रिक्षा चालक संघटना तसेच नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांच्या समन्वयाने गणेशोत्सव कालावधीत करावयाच्या उपाययोजनांवर धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.

दिनांक 7 सप्टेंबर, ते 25 सप्टेंबर, 2026 या कालावधीत नगरपंचायत मालकीचा रस्ता हॉटेल अभिमन्यु ते काळप नाका एस.टी. डेपोपर्यंतचा रस्ता पूर्णपणे मोकळा ठेवण्यात येणार असून, या मार्गावर व्यापाऱ्यांना व्यापार करण्यास सक्त मनाई राहणार आहे. तसेच गणेशमूर्ती व गणेशोत्सव साहित्य विक्री (गणेश माटी साहित्य) करणाऱ्या विक्रेत्यांना दिनांक 12 सप्टेंबर 2026 ते दिनांक 13 सप्टेंबर, 2026 या कालावधीत पोस्टाजवळ व नगरपंचायत पटांगण येथे व्यापार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय नार्वेकर बेकरी ते भाट बिल्डिंग परिसर, नगरपंचायत मालकीचे पटांगण व भाजीमार्केट या ठिकाणी किरकोळ पथविक्रेत्यांना व्यापार करण्यास परवानगी राहणार आहे.

गणेशोत्सव कालावधीत शहरातील वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक सुरक्षितता व शहराचे सौंदर्य अबाधित राहावे यासाठी नगरपंचायतीची पूर्वपरवानगी न घेता कोणत्याही व्यक्ती, संस्था, गणेशोत्सव मंडळ अथवा व्यापाऱ्यांनी होर्डिंग, बॅनर, फ्लेक्स, जाहिरात फलक अथवा कमानी लावू नयेत. परवानगीशिवाय लावण्यात आलेले होर्डिंग, बॅनर व जाहिरात साहित्य नगरपंचायतीमार्फत हटविण्यात येऊन संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

कुडाळ शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कुडाळ-पुणे, मुंबई तसेच इतर ठिकाणांहून कुडाळ शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व खाजगी व लक्झरी बसेसना हॉटेल अभिमन्यु ते काळप नाका या मार्गावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सदर बसेसची वाहतूक केवळ महामार्गावरून सुरू राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी काळप नाका, सत्यम हॉटेल व आर.एस.एन. हॉटेल या ठिकाणी प्रवाशांच्या चढ-उताराची व्यवस्था करण्याबाबत संबंधितांना सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

दिनांक 07 सप्टेंबर, 2026 ते दिनांक 25 सप्टेंबर, 2026 या कालावधीत मालवण-कुडाळ मार्गावरील अवजड डंपर वाहतूक बंद ठेवून ती मालवण-नेरुर (जकात)-एम.आय.डी.सी. कुडाळ या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. तसेच सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत मुख्य बाजारपेठेत अवजड व चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. 

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अनंत मुक्ताई हॉटेलसमोरील मोकळी जागा व दिवाणी न्यायालय परिसरात चारचाकी वाहनांसाठी, तर जिजामाता चौक ते नक्षत्र टॉवर या मार्गावर दुचाकी वाहनांसाठी सम विषम पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. पुष्पा हॉटेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावर नो-पार्किंग झोन निश्चित करण्यात येणार आहे. सिंगल लाईन रिक्षा व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील 10 गणेशघाटांवर मंडप, विद्युत रोषणाई, ध्वनिक्षेपक, स्वच्छता व निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. विसर्जनाच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापुरुष गणेश घाट, गुलमोहर शेजारील गणेश घाट व सांगिर्डेवाडी गणेश घाट येथे मगरीचा वावर लक्षात घेऊन वन विभागाच्या वनरक्षकांची नियुक्ती करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

सर्व गणेशघाटांवर प्रथमोपचार पेटी व वैद्यकीय सुविधा, तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे व खराब रस्त्यांची दुरुस्ती, हायमास्ट दिव्यांची देखभाल आणि धोकादायक विद्युत तारांची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आले आहे.

गणेशोत्सव कालावधीत तक्रारी व आपत्कालीन परिस्थितीवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी कुडाळ नगरपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत राहणार असून, गणेशघाटांवर नोडल अधिकारी व सहाय्यक कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. 

गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित व सुव्यवस्थित पार पडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या वाहतूक, पार्किंग व विसर्जन व्यवस्थेचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!