कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील साळगाव-बागवेवाडी येथील विष्णू राजन बागवे (वय २६) या तरुणाचा साळगाव- मळावाडी येथील पुलाखालील पाण्यात पडून बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेलेल्या विष्णूचा मृतदेह अखेर आज मंगळवारी (८ सप्टेंबर) सकाळी स्थानिकांना ओहोळाच्या पात्रात आढळून आला.
प्राप्त माहितीनुसार, विष्णू राजन बागवे हा ५ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. त्याच्या नातेवाईकांकडून विष्णूचा परिसरात शोध घेण्यात येत होता. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. दरम्यान, साळगाव-मळावाडी येथील पुलाखाली असलेल्या पाण्यात तो पडला असावा, अशी माहिती समोर आली.
पाण्यात पडल्यानंतर तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. त्याचा मृतदेह काही अंतरावर ओहोळाच्या पात्रात वाहत गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ८ सप्टेंबर रोजी सकाळी स्थानिक नागरिकांना ओहोळाच्या पात्रात मृतदेह आढळून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल अनिल पाटील करीत आहेत.


