संविधान बचाव मोर्चाला सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित समाज महासंघाचा पाठिंबा 

0

कुडाळ | प्रतिनिधी

दि. ५ ऑक्टोबर रोजी जो संविधान मोर्चा कणकवलीमध्ये आयोजित केलेला आहे. त्या संविधान बचाव मोर्चाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, एनटी आणि व्हिजे या प्रवर्गातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास ६० पेक्षा विविध समाजाच्या वतीने आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित समाज महासंघाच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर करीत आहोत, अशी माहीती ओबीसी व आरक्षित समाज महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव अॅड.नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली.

      अॅड.वेंगुर्लेकर म्हणाले, आता लवकरच विविध निवडणुका लागणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सहा महिन्यापूर्वी आमच्या महासंघाच्या वतीने आम्ही जात पडताळणी कार्यालयाकडे अर्ज दिलेला होता की आमच्या ओबीसी आणि आरक्षित समाजातील बऱ्याच लोकांची प्रकरणे प्रलंबित आहेत पण अद्याप पर्यंत काही प्रकरणे त्या कार्यालयाकडून क्लिअर झालेली नाहीत. कदाचित त्यांचा काहीतरी वेगळा हेतू त्यामागे असू शकतो आणि यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सुद्धा आम्ही त्याबद्दल लेखी तक्रार सुद्धा दिलेली होती. आम्ही जात पडताळणी कार्यालयाच्या सर्व विभागातील त्यांच्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की येत्या १५ तारीखच्या अगोदर आमच्या ओबीसी आणि आरक्षित महासंघाच्या वतीने जे निवेदन दिलेले आहे आणि जी नावे आम्ही त्यांना दिलेली आहेत त्या सर्वांचे जात पडताळणी प्रमाणपत्र लवकरात लवकर क्लियर करावे अन्यथा कोकण भवन मधील वरिष्ठ कार्यालय आणि मंत्रालय स्तरावरील वरिष्ठ अधिकारी यांची लवकरच भेट घेऊन आम्ही त्या संदर्भात दाद मागू, अशी माहीती अॅड.वेंगुर्लेकर यांनी दिली. यावेळी ओबीसी समाज प्रदेश प्रतिनिधी काका कुडाळकर, महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन वाळके, कार्याध्यक्ष सुनिल भोगटे, ओबीसी नेते तथा भंडारी समाजाचे जिल्हा प्रतिनिधी रूपेश पावसकर, भंडारी समाजाचे तालुका प्रतिनिधी रमेश हरमलकर आदी उपस्थित होते.