निवडणूकच नव्हे तर या विरोधकांनाही दीपकभाई प्रेमानेच जिंकतील : – सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी 

0

सावंतवाडीचा सांस्कृतिक चेहरा जपण्याचे दीपक केसरकर यांचे कार्य विरोधकांनाही मनातून मान्यच

कुडाळ | प्रतिनिधी 

ज्या झाडाला आंबे लागतात, त्याच झाडावर दगड मारले जातात हे साऱ्यांनाच माहिती आहे. आमदार दीपक केसरकर यांना सावंतवाडीच्या सांस्कृतिक जडणघडणीची जाण आहे. सावंतवाडी मतदार संघाला स्वतःची अशी एक सांस्कृतिक ओळख आहे आणि मागील अनेक वर्षे त्या संस्कृतीला कोणाकडूनही तडा न जाऊ देण्याचे मा. दीपक केसरकर यांचे कार्य त्यांच्या राजकीय विरोधकांनाही मनातून पटलेले आहे . विरोधकांची टीका ही केवळ राजकीय स्वार्थ आणि आपापल्या राजकीय गणितातून आहे,मनातुन नाही. राजकारण म्हणून हे चालायचेच. मात्र या विरोधकांशी योग्य वेळी चर्चा करून दीपक भाई निवडणुकीआधीच त्यांनाही जिंकतील, असे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते श्री रत्नाकर जोशी यांनी म्हंटले आहे.

दीपकभाईंच्या कामावर ज्यांची टीका चालली आहे, ती केवळ खुर्चीच्या गणितावरची आहे. दीपकभाईंच्या दक्षतेमुळे आज काहींना आपले टक्केवारीचे भ्रष्टाचारी राजकीय गणित हवे तसे साधण्यात अडचण येते आहे हे वास्तव जनतेलाही माहित आहे. ठेकेदारांकडून टक्केवारीची लूट करण्यात ज्यांना अडसर होतो आहे, त्यांना अशा अनेक अनैतिक कारभारांसाठीच सावंतवाडी मतदारसंघ आपल्या ताब्यात हवा आहे, आणि त्यातूनच दीपकभाईंच्या विरोधात असे लोक बदनामीची राळ उडवत आहेत. सावंतवाडीकर जनता यांना ओळखून आहे. दीपकभाईंनी काय कार्य केले, आडाळी एमआयडीसीमधुन किती नवीन उद्योग येणार आहे, त्यातून किती रोजगार निर्माण होणार आहे, दीपक भाईंच्या संकल्पनेतून सावंतवाडी मतदारसंघात लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला जात आहे, आपल्या भागातील ग्रामीण मुलांना जर्मनीसारख्या प्रगत देशात शिक्षण आणि रोजगाराची दालने कशी उघडली आहे याबाबत शिवसेना कोणत्याही जाहीर व्यासपीठावर विरोधकांना भिडू शकते. पण ज्यांना राजकीय चिखलफेकच करायची आहे, अशा लोकांना उत्तर देत बसण्यात दीपकभाईंसारख्या राज्यभर दबदबा असणाऱ्या नेत्याला स्वारस्य नाही. सावंतवाडीची सुसंस्कृत जनता त्यांना जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा परस्पर उत्तर देईल. मात्र स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी सावंतवाडीचा सांस्कृतिक चेहरा ओरबडण्याची विरोधकांची ही प्रवृत्ती चांगली नाही. सावंतवाडी मतदार संघाला महाराष्ट्रात मानाचे स्थान मिळवून देण्याची क्षमता असणाऱ्या दीपकभाई केसरकर यांच्यासारख्या नेत्याच्या पाठीशी उभे राहणे ही आज काळाची आणि महाराष्ट्राच्या पुढील भवितव्याची गरज आहे. विजय केवळ दीपकभाईंचा नव्हे तर त्यांच्या रूपाने सावंतवाडी मतदार संघाच्या विकासाच्या न भूतो न भविष्यती अशा महासंकल्पाचा निश्चितपणे होणार आहे, असा दृढ विश्वास शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते श्री रत्नाकर जोशी यांनी व्यक्त केला आहे.