शिवसेना पदाधिकाऱ्यांचा बांधकाम अधिकाऱ्यांना घेराव

0

कणकवली | प्रतिनिधी

राजकोट येथील छत्रपतींचा पुतळा कोसळण्याला सार्वजनिक बांधकाम मधील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार जबाबदार आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे भेटीची वेळ देऊनही कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. ते किती दिवस लपून राहणार आणि त्यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण किती दिवस वाचवतात हेच आम्ही पाहतो असा इशारा शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी आज दिला. शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज सार्वजनिक बांधकामदी कार्यालयाला घेराव घातला. दरम्यान कार्यकर्त्यांना गेटवरच पोलिसांनी अडविल्याने काही काळ तणाव झाला होता. मात्र प्रमुख पदाधिकाऱ्यांना नंतर बांधकामचे अभियंता श्री. बासूदकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी सोडण्यात आले.कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. सर्वगोड यांच्या भेटीसाठी ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज वेळ मागितली होती. त्यानुसार शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते दुपारी साडे अकरा वाजता सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जाण्यासाठी निघाले असता, सर्व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी गेटवरच अडवले. त्यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्याशी शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, राजू राठोड यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. आम्हाला कोणत्या कारणासाठी अडवता? याची विचारणा पोलीस अधिकाऱ्यांना केली. यात काही काळ वादंग झाला. त्यानंतर आठ ते दहा जणांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बांधकाम कार्यालयाकडून बोलविण्यात आले. या आंदोलनावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष निलम पालव सावंत, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, अनुप वारंग, महेश कोदे, बंडू ठाकूर, माधवी दळवी, कासार्डे विभाग प्रमुख तात्या निकम, आबु मेस्त्री, संजना कोलते, धनश्री मेस्त्री, नासीर शेख आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शिवसेना शिष्टमंडळाशी अभियंता श्री. बासूदकर यांनी चर्चा केली. यावेळी बोलताना सतीश सावंत म्हणाले की, पहिल्यांदा निकृष्ट दर्जाची कामे करायची करायची, नंतर टेंडर प्रक्रिया करायची ही पद्धत बांधकाम विभागाने सुरू केली आहे. अशाच निकृष्ट कामामुळे कोट्यवधी रुपये खर्च होऊन देखीलन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. या प्रकारला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वगोड जबाबदार आहेत. त्यामुळेच भेटण्याची वेळ देऊनही ते भेटीसाठी उपस्थित राहत नाहीत.

दरम्यान राजकोट किल्ला व पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा याबाबतच्या सर्व निविदांची माहिती द्या. कणकवली तालुक्यातील १३ कोटींच्या २ पुलांची निविदा ऑनलाईनला का दिसत नाही. यासह विविध प्रश्नांचा भडीमार ठाकरे शिवसेनेचे सतीश सावंत, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, उत्तम लोके आदींनी केला. तर येत्या ११ ऑक्टोबर पर्यंत सर्व माहिती लेखी स्वरुपात दिली जाईल अशी ग्वाही अभियंता श्री. बासूदकर यांनी दिली.