कुडाळ | प्रतिनिधी
जांभवडे हायस्कूल समोर एस. टी. बस थांबा व्हावा म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून जे आंदोलन केले ते सुसंस्कारीत शिक्षकांच्या पेशाला शोभणारे नाही. अशा बेजबाबदार शिक्षकांची चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणी कुडाळ एस. टी. बस आगाराच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने ओरोस येथील शिक्षणाधिकारी व कुडाळ तहसीलदार यांच्या जवळ निवेदनाद्वारे केली आहे.
हे निवेदन कुडाळ तहसीलदार येथे नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्याजवळ देण्यात आले यावेळी दिनेश शिरवलकर, नितीन धुरी, प्रशांत गावडे, राजू नागडे, महेश वेंगुर्लेकर, रोशन तेंडुलकर हे एस. टी. बसचे कर्मचारी उपस्थित होते. या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, जांभवडे हायस्कूलच्या अलीकडे ००.०२ कि.मी. पलीकडे ००.०२ कि.मी. अंतरावर दोन ग्रा.पं. विनंती बस थांबे मंजूर आहेत. परंतु हायस्कूलच्या गेटसमोर थांबा मंजूर व्हावा, यासाठी जांभवडे हायस्कूलच्या मुख्यध्यापकांनी एस. टी. च्या कणकवली येथील विभागीय कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार विभागीय कार्यालयाच्या अधिका-यांनी तेथे जावून सर्व्हे केला असता मागणी केलेल्या बस थांब्याच्या अलिकडे व पलिकडे असे ००.०२ कि.मी. अंतरावर दोन बस थांबे असाल्यामुळे मागणी केलेला बस थांबा नामंजूर करण्यात आला व तसे पत्र हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले. परंतु हायस्कूलचे चेअरमन, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी मुले नियमितपणे शाळेत आली असताना त्यांना शाळेच्या बाहेर जेवून रस्त्यावर बसवले व एम.टी च्या बस अडविण्यास प्रवृत्त केले. त्यांनी एस. टी. च्या विरोधात घोषणाही दिल्या वास्तविक पाहता शिक्षणासारखे पवित्र कार्य हे शिक्षकांकडून होत असते. परंतू जांभवडे हायस्कूलचे शिक्षक, मुख्याध्यापक बस थांबा मागणीसाठी आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे रस्त्यावर बसवून आंदोलन करतात विद्यार्थ्यांना बंड करायाला लावतात हा विषय शिक्षक किती बेजबाबदारपणे वागतात हे सिध्द करतो. मुले शाळेत आल्यावर त्यांची सर्वस्वी जबाबदारी ही संस्थेची पर्यायाने शिक्षकांची असताना मुलांना अनधिकृतपणे रस्त्यावर बसवतात ही बाब अतिशय गंभीर आहे. सदर ठिकाणी जर बसचा ब्रेक लागला नसता किंवा जर बस बेक फेल झाली असती तर हा विषय विद्यार्थ्यांच्या जिवाशी बेतला असता याची जराशीही फिकिर समाजातील या सुज्ञ शिक्षकांना नाही का? हा विषय संशोधनाचा म्हणावा लागेल.
एस. टी. बसमध्ये आसनक्षमता ही ४४ अधिक ११ अशी असते. परंतू एस.टी. चे चालक वाहक विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून आसनक्षमतेच्या दुप्पट विद्यार्थ्यांची ने-आण करतात. परतु त्यांना त्रास देण्याचे काम अशाप्रकारे गाडी अडवून केले जात आहे मुळातच हायस्कूलच्या गेटसमोर थांबा मंजूर नसताना व तसे पत्र एस. टी. च्या विभागीय कार्यालयाकडून प्राप्त झाले असतानाही बस अडविण्याचा केलेला प्रकार हा निश्चितच योग्य वाटत नाही. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेसाठीचे कलम १४४ (मनाई आदेश) असतानाही सुशिक्षित, सुज्ञ शिक्षक वर्ग सदर आंदोलनासारखे प्रकार करतात, मुलांना बंड करण्यास घोषणा देण्यास प्रवृत्त करतात हा विषय समाजासाठी आदर्शवत नाही. भावी पिढी ज्यांच्या सुसंस्कारावर अवलंबून असते अशा वदनीय, गुरुवर्य शिक्षकांनी बस रोखून आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांची सुखरुपपणे ने-आण करणाऱ्या एस.टी बसच्या कर्मचाऱ्यांना त्रास देणे योग्य आहे का ? याचाही विचार करण्यात यावा. जर याठिकाणी बस थांबा मंजूर झाला तर बस पकडण्यासाठी विद्यार्थ्यांची धावाधाव, पळापळ होवून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर ठिकाणाचे आपण पाहणी केल्यास हायस्कूलच्या गेटपासून अलीकडे व पलीकडे असे दोन बस थांबे हायस्कुलला किती जवळ आहेत हे आपल्या निर्देशनास येईल. तरी या सर्व प्रकाराची चौकशी करून आपण संबंधित शिक्षकांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी कुडाळ आगाराच्या एस. टी. बस कर्मचाऱ्यांनी केली आहे.
