मुंबई | वृत्तसेवा
आगामी निवडणुकीत बेसावध राहू नका. शमीच्या झाडावरील शस्त्र आता उतरवा. ही क्रांतीची वेळ आहे. ही वचपा घेण्याची संधी आहे. या सगळ्यांचा तुम्हाला वेध घ्यावा लागेल, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जनतेला केले आहे. दसऱ्यानिमित्त राज ठाकरेंचा पॉडकास्ट प्रसारित करण्यात आला. यातून राज ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला.
राज ठाकरे म्हणाले की, आज दसरा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. दसरा म्हटलं की, आपण सोनं लुटणे आणि एकमेकांना शुभेच्छा देणे हे आपण दरवर्षी करतो. महाराष्ट्राचं सोनं गेली अनेक वर्ष लुटलं जात आहे आणि आम्ही फक्त आपट्याची पानं एकमेकांना वाटत आहोत. आपल्याजवळ आपट्याची पानं सोडून दुसरे काही राहत नाही. मात्र आमचं दुर्लक्ष. आम्ही आमच्या स्वतःच्या आयुष्यात मजगुल तर कमी कधी आम्ही जातिपातीत मजगुल आहोत. आमचं या लोकांकडे लक्ष राहणार कधी? आजचा दसरा हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो निवडणुकीच्या तोंडावर आहे. अशा वेळेला तुम्ही बेसावध राहून चालणार नाही.
दरवर्षी तुम्ही बेसावध राहतात आणि हे राजकीय पक्ष आपापले खेळ करत राहतात. या सगळ्यात महाराष्ट्राची प्रगती कुठे चालली आहे? नुसते रस्ते बांधणे आणि उड्डाणपूल बांधणे ही प्रगती नसते. आमच्या हातात मोबाईल आले कलर टीव्ही आले, तुमची गॅजेट्स म्हणजे प्रगती नव्हे. प्रगती समाजाची व्हावी लागते. अजूनही आपण चाचपडतच आहोत. पण, इतक्या वर्षांच्या तुम्हाला प्रगतीच्या थापा मारून देखील तुमच्यातला राग व्यक्त होताना मला दिसत नाही. त्याच लोकांना दरवेळेस निवडून देतात आणि नंतर पश्चातापाचा हात कपाळावर मारत राहायचा आणि नंतर पाच वर्षा बोंब मारायची.
आपण म्हणतो ना पांडवांनी शस्त्र शमीच्या झाडावर ठेवली होती. तसेच तुम्ही ऐन मोक्याच्या वेळेला शस्त्र झाडावर नेऊन ठेवतात. जे मतदानाचे शस्त्र तुमच्या हातात आहे ते मतदानाच्या दिवशी न वापरता या लोकांना शिक्षा न करता तुम्ही ती नुसती शस्त्र वरती ठेवून देतात. निवडणुका संपल्या की मग शस्त्र बाहेर काढतात आणि या सगळ्या लोकांवर बोलत राहतात. पण, मतदानाच्या दिवशी काय होते? हा माझ्या जातीचा आहे, हा माझ्या जवळचा आहे, हा माझ्या ओळखीचा आहे असे करून राज्य उभे राहत नाही. आज तुम्हाला संधी आली आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. तुम्ही सर्वांना संधी दिली. मी उद्या आपला मेळाव्यातून सविस्तर बोललेलंच. या निवडणुकीत तुम्ही मतदारांनी क्रांती केली पाहिजे. आजपर्यंत तुम्ही जे करत आहात या लोकांना तुम्ही जोपासले, सांभाळले ते तुमच्या मतांशी प्रतारणा करण्यासाठी आले. तुम्हाला अत्यंत गृहीत धरले गेले. दरवेळेला गृहीत धरणे हेच महाराष्ट्राचे नुकसान करत आले.
महाराष्ट्रातले तरुण-तरुणी, शेतकरी, सर्वसामान्य व्यक्तींना माझी हात जोडून विनंती आहे की, येणाऱ्या निवडणुकीत बेसावध राहू नका. शमीच्या झाडावरील शस्त्र आता उतरवा. ही क्रांतीची वेळ आहे. ही वचपा घेण्याची वेळ आहे. या सगळ्यांचा तुम्हाला वेध घ्यावा लागेल. गेली अनेक वर्ष आणि खासकरून गेली पाच वर्ष तुमच्या मतांची ज्यांनी प्रतारणा केली ज्यांनी तुम्हाला गृहीत धरला. वेड्यावाकड्या युती आणि आघाड्या करत बसले. आज बोलतील सगळेजण एकमेकांचे उणीधुणी काढतील. पण, त्याच्यात तुम्ही कुठे असणार? तुम्ही यात नसणार आहात. मी महाराष्ट्राचा गेल्या अनेक वर्षापासून स्वप्न पाहत आहेत. हे स्वप्न साकारण्याची संधी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना मिळू द्या. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र बनवणे हेच माझं स्वप्न आहे. आत्ताच शमीच्या झाडावरून ते सगळे शस्त्र उतरवा आणि ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी या सगळ्या लोकांचा तुम्ही वेध घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
