Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeमहाराष्ट्र२ जानेवारी, महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन...

२ जानेवारी, महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन…

 २ जानेवारी 

महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन

 

‘पोलिस’ हा शब्द उच्चारताच आपल्या नजरे समोर उभा राहतो एका विशिष्ट वर्दीतील सरकारी अंमलदार. ‘पोलिस’ हा शब्द, देशातील पोलिस दलाला मोठा इतिहास आहे, मात्र याची अधिकृत आणि एकत्रित नोंद अद्याप झालेली नाही. सात बेटांचे संरक्षण करण्यासाठी १६७२ पासून रक्षक नेमले गेले. भंडारी ब्रिगेड नावाची ही फौज १७ फेब्रुवारी १७७९ मध्ये अधिक शिस्तबद्ध होत त्यातून मुंबई पोलिस दल निर्माण झाले. महाराष्ट्र पोलिस दल २ जानेवारी १९६१ रोजी स्थापन झाले. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला, तोच पोलिस दलाचा स्थापना दिन. महासंचालक संजीव दयाळ यांच्या पुढाकारातून २०१२ पासून हा ‘स्थापना दिन’ साजरा होतो. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदला पैकी एक असून त्यात १० पोलीस आयुक्तालये व ३६ जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे. महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे. महाराष्ट्र हे औद्योगिकरणा मध्ये प्रगत राज्य असून, त्यामध्ये अनेक शहरी व्यावसायिक आणि व्यापारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात पोलिसांच्या कामकाजासाठी आयुक्तालय पध्दतीचा स्विकार करण्यात आला आहे. राज्यात १० आयुक्तालये आणि ३६ जिल्हा पोलीस घटक आहेत. ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत. पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिना निमित्त पोलिस या शब्दाची माहिती. ‘पोलिस’ हा युरोपियन भाषेमधून आलेला शब्द आहे. त्याचा शब्दश: अर्थ ‘नगरासाठी’ म्हणजे इंग्रजी भाषेत ‘ए फॉर द सिटी’ असा आहे. आपल्या देशाच्या प्राचीन इतिहासामध्ये ही ‘संस्कृत’, ‘प्राकृत’ व ‘पाली’ साहित्यातून ‘नगरपाल’ म्हणजे नगराचे रक्षण करणारा, असे नाव मुख्य पोलिस अधिकाऱ्याला दिलेले आढळते. 

 

पोलिस या विदेशी शब्दाला सर्वात योग्य आणि प्राचीन भारतीय शब्द म्हणजे ‘आरक्षी’ हा होय. शरीर व मालमत्तेचे रक्षण करणारा ‘आरक्षी’ होय. भारता मध्ये आजही काही ठिकाणी पोलिस फोर्सला ‘आरक्षीदल’ हा शब्द आढळतो. शेकडो वर्षापूर्वीं पाषाण युगामध्ये आदिमानव असंघटित अवस्थेत फिरत होता. प्रचंड मोठी जंगले, दुथडी भरून वाहणाऱ्या अफाट नद्या, त्यातून फिरणारे अजस्त्र सुसरी, मासे, दऱ्याखोऱ्यातून फिरणारे अजस्त्र महाकाय श्वापदे या सर्वांशी मुकाबला देत जगणे हे मानवासारख्या दुबळ्या प्राण्याला फार अवघड होते. प्रत्येक प्राण्याला स्वसंरक्षणाकरिता देवाने काही ना काही दिले आहे. हत्ती सारख्या प्राण्याला अजस्त्र शरीर, तलवारी सारखे दात, गेंड्याला प्रचंड ताकद व मोठ्या खंजिरा सारखा दात, वाघसिंहाला ताकदी बरोबरच अणकुचीदार नखे व सुळे, तर पक्षांना अणकुचीदार चोच. पण मानव प्राण्याला काय? स्वसंरक्षणासाठी तसे काहीही नाही. परंतु ‘बुद्धी’ दिलेल्या सर्वश्रेष्ठ देणगीने मानवाची आजची ही प्रगत अवस्था प्राप्त होऊन महाकाय प्राण्यांना, रौद्ररूप धारण करणाऱ्या निसर्गालाही काही प्रमाणात त्याने गुलाम बनवले आहे. याच बुध्दीच्या जोरावर आदिमानवाने महाकाय अजस्त्र प्राण्यांपासून स्वत:चा बचाव करण्याकरिता समूहात राहण्याचे ठरवले. ‘बुद्धी’ या देणगीचा वापर करून संघटित राहण्याचा मानवाच्या इतिहासातील पहिला शोध व बोध असावा. कुटुंबाच्या रूपाने मानवाचा पहिला समूह अस्तित्वात आला. पाषाणापासून बनवलेली शस्त्रे तो वापरू लागला. एकत्र राहून शिकार करू लागला. केवळ समूहाने राहून चालत नाही, हे लक्षात आल्यावर शिकार करू लागला. केवळ समूहाने राहून चालत नाही, हे लक्षात आल्यावर त्याही पुढे जाऊन समूहातील एकत्र आलेल्या जाणाऱ्या लोकांनी आचार, विचार व अनुभव यांची सांगड घालून जीवनातील पुढचा टप्पा गाठला. 

 

एक आचार एक विचार यातून सांस्कृतिक प्रगती झाली. वेगवेगळ्या आचारातून, विचारातून समूहाचे वेगवेगळे गट पडून विविध धार्मिक समाज व्यवस्था अस्तित्वात आली. मानवी कृतीचे तर्कसंगत विश्लेषण होऊ लागले. चांगले कृत्य, वाईट कृत्य, न्याय, अन्याय याबाबत ठामपणे विचार होऊ लागला. संघटित समाजाच्या निकोप वाढीसाठी चांगल्या कृत्यांना पाठिंबा, प्रोत्साहन आणि अन्यायी अनिष्ट दुष्कृत्यांना पायबंद घालण्याकरिता एक प्रकारची संहिता, नियमावली असणे आवश्याक वाटल्याने त्याबाबत एकमत झाले. त्यानुसार पुढील पावले पडत गेली. समाजातील दुष्कृत्यांना पायबंद घालण्याकरिता व ती टाळण्याकरिता तसेच ते करणाऱ्यांना शासन देणे करिता मानवी समूहा मधील म्हणजेच समाजातील ठराविक व्यक्तींचे गटावर याची जबाबदारी देण्यात आली. हीच पोलिसांची मूळची संकल्पना होती. ‘मृच्छकटीक’ किंवा ‘शाकुंतल’ या पौराणिक नाटका मधून प्राचीन भारतातील पोलिस दृष्टीस पडतो. चोरीचा संशय असलेल्या एका कोळ्याची चौकशी एक पोलिस नाईक व त्याचे दोन शिलेदार (पोलिस) करत आहेत हे दृश्य पाहावयास मिळते. ग्रामीण भागात बारा बलुतेदारा इतकेच महत्त्व पोलिसांना होते. नगराचे रक्षण करणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यास ‘नगरपाल’ म्हटले जायचे. त्यास ‘कोट्टापाल’ असेही नाव होते. हिंदीत ‘कोतवाल’, बंगालीत ‘कोटाल’ यावरून ‘कोतवाल’ हा शब्द रूढ झाला. उत्तर भारतात आजही पोलिस ठाण्यांना ‘कोतवाली’ असे म्हणतात. 

 

मुस्लीम तसेच मराठा राज्यकर्त्यानी त्यांच्या काळात खास पोलिस दल न ठेवता इतर अंमलदारांवर ती जबाबदारी सोपवली. मराठा राज्यकर्त्यानी पोलिसाचे काम गावप्रमुखावर पाटलावर सोपवले होते. त्यावेळचा पाटील (आताचा पोलिस पाटील) हा गावा मधील रामोशी, महार, मांग, भिळू, कोळी, मांगल्या या जमाती मधील लोकांचे मदतीने चोरांचा बंदोबस्त करीत असे. गावात पहारा, गस्त, दवंडी वगैरे कामे त्यांचे कडूनच केली जात असत. ब्रिटिशांनीही नंतर गावपातळीवर पाटलाचे महत्त्च ओळखून ती जबाबदारी त्याच्यावरच टाकली. पाटलाला मग पोलिस पाटील म्हणून म्हटले जाऊ लागले. सन १८६० पर्यंत तरी खास असे पोलिस दल नव्हते. त्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. आजच्या आधुनिक पोलिस दलाची निर्मिती ही हिंदुस्थानवर साम्राज्य केलेल्या ब्रिटिशांनी केली. हिंदुस्थानी जनतेची सुरक्षितता राखली जावी, त्यांचे मालमत्तेचे रक्षण व्हावे, कायदा व सुव्यवस्था राखली जावी हा पोलिस दल स्थापने मागचा ब्रिटिशांचा मुळीच उद्देश नव्हता. भारतीय पोलिस दलाच्या निर्मितीची बीजे ही स्वातंत्र्यपूर्व काळात १८५७ मध्ये झालेल्या स्वातंत्र्य युद्धात आढळतात. ब्रिटिश साम्राज्या विरुद्ध १८५७ मध्ये मोठे बंड झाले. झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, कुँवरसिंह यांनी या स्वातंत्र्य समरात महान पराक्रम गाजवला. हिंदुस्थान स्वतंत्र करण्याकरिता ब्रिटिशा विरुद्ध हे युद्ध खेळले गेले. मिरत छावणीत ब्रिटिश अधिकाऱ्यावर मंगल पांडे या शिपाई गड्याने गोळी झाडल्या नंतर या बंडाला सुरुवात झाली. बघता बघता साऱ्या हिंदुस्थानभर ते बंड पेटले. परंतु नंतर मात्र ब्रिटिशांनी हे बंड मोडून काढले. नानासाहेब पेशवे, कुँवरसिंह, झाशीची राणी लक्ष्मीबाई, थोर सेनानी तात्या टोपे, बहादूरशाहा जफर यांच्या त्यागाबद्दल, सहभागाबद्दल डोळेझाक करून गोऱ्या साहेबाने या स्वातंत्र्य युद्धास शिपायांचे बंड (म्युटिनीटी ऑफ सिपॉय) असे हिणवले. 

 

या बंडानंतर ब्रिटिशांचे लक्षात आले की, हिंदुस्थानात प्रचंड प्रमाणात अंतर्गत अशांतता निर्माण झाली आहे. सत्तेविरुद्ध रोज क्रांतिकारक तयार होऊ लागले आहेत. साऱ्या हिंदुस्थानवर त्यांच्या संघटना सहकार्याने वाढू लागल्या आहेत. छोट्या मोठ्या बंडाळ्या करणारे क्रांतिकारी लोक, स्वातंत्र्याकरिता लोकांमध्ये जागृती करणारे लहानमोठे नेते, जनजागृतीसाठी त्यांनी चालवलेली साप्ताहिके, दैनिके, गुप्तपणे त्यांच्या चालणाऱ्या मिटींगा या सर्व गोष्टी उधळून लावण्याकरिता व त्यास पायबंद घालण्याकरिता सुसंघटित अशा अंतर्गत यंत्रणेची गरज आहे. त्या दृष्टीने धूर्त ब्रिटिशांची पावले पडू लागली. त्यादृष्टीने सर्व तयारी झाल्यानंतर सर एच.बी.ई. फ्रेरे यांनी विधीमंडळा मध्ये (लेजिस्लॅटीव्ह कॉंसिल) बील सादर केले. त्याचेच पुढे भारतीय पोलिस कायदा नं. ५ सन १८६१ (इंडियन पोलिस ऍक्ट व्ही-१८ ऑफ १८६१) मध्ये रूपांतर होऊन सुसंघटित अशा पोलिस दलाची निर्मिती झाली. विशेष सांगण्यासारखी बाब म्हणजे आजही तोच कायदा पोलिस खात्याला लागू आहे किंवा पोलिस खात्याच्या मानगुटीवर बसला आहे. ब्रिटिशांनी तयार केलेले पोलिस दल हे हिंदुस्थानी स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी क्रांतिकारकांना व त्यांना आश्रय देणाऱ्यांना चिरडण्याकरिता वापरले गेले. कोणत्याही पोलिस कारवाईचा निर्णय घेणारे, अंमलबजावणी करणारे अधिकारी ब्रिटिश असत व त्यांचे हाताखाली काम करणारे कनिष्ठ अधिकारी हे भारतीय असत. शिपाई, नाईक हवालदार, फौजदार व निरीक्षक इत्यादी पोस्टवरील कर्मचारी, अधिकारी हे इंडियन होते व सहाय्यक पोलिस आयुक्त, डी.आय.जी. हे सर्व ब्रिटिश असत. 

 

कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी हे अशिक्षित किंवा कमी शिकलेले, वरिष्ठांचा हुकूम मानणारे, त्यांच्या आदेशा प्रमाणे खऱ्याचे खोटे, खोट्याचे खरे करणारे, अडाणी, आडगे, रगेल व धटिंगण असे होते. वरिष्ठांच्या म्हणजेच ब्रिटिशांचे आदेशा प्रमाणे आपल्याच देश बांधवांना वाटेल तसे छळायला ते मागेपुढे पाहत नसत. धूर्त ब्रिटिश साहेबांच्या आदेशा मागील कुटिल हेतू समजण्या इतकी कुवत त्यांच्या मध्ये नव्हती. शिस्तीच्या गोऱ्या कातडीच्या साहेबाचे वाटेल ते हुकूम शिरसावंद्य मानून आपल्याच देशवासीयांचे, देशबांधवांचे, गळे घोठण्याचे, त्यांना यमयातना देण्याचे अघोरी कृत्य पोलिस करत त्यामुळे जनता व पोलिस यांच्या मध्ये जी दरी निर्माण झाली ती अद्यापही पूर्णपणे भरून आली नसल्याचे आढळून येते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात पोलिस दलात खूप सुधारणा होत गेल्या. सुशिक्षितांचे प्रमाण वाढले गेले. पोलिस, कॉन्स्टेबल सारख्या कनिष्ठ पदावर आज ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट तरुण भरती होत आहेत. डॉक्टर, इंजिनिअर त्याच प्रमाणे लॉ, मॅनेजमेंटच्या पदव्या घेतलेले तरुण योग्य नोकरीच्या किंवा संधीच्या अभावाने पोलिस उपनिरीक्षक पदासारख्या कनिष्ठ पदावरही पोलिस खात्यात नोकरी करत आहेत. सुशिक्षितांचे प्रमाण वाढल्याने पोलिस दल हे जास्तीत जास्त लोकाभिमुख होत आहे. मानवी हक्कांची जाणीव तसेच त्यांची अंमलबजावणी अधिक जागृत व सुशिक्षित झालेल्या समाजामुळे पूर्वीच्या आडमुठ्या पोलिस भूमिकेची जागा कार्याच्या भावनेने घेतलेली आहे. जनता व पोलिस यांच्या मधील दरी झपाट्याने कमी होत चालली आहे. पोलिसातील माणूस व माणसातील पोलिस एकमेकांनी ओळखायला सुरुवात केल्याने सुसंवाद प्रस्थापित होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!