जिल्हा ओबीसी व आरक्षित महासंघाची कुडाळ येथे झाली सभा
सभेनंतर जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी घेतली पत्रकार परिषद
कुडाळ | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओबीसी व आरक्षित समाज हा ७० टक्के आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाची पादत्राणे बाजूला सारून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभांच्या तीनही मतदार संघामध्ये ओबीसी व आरक्षित समाजाचे उमेदवार रिंगणात उभे करण्याचा निश्चय झाला असल्याचा सिंधुदुर्ग ओबीसी व आरक्षित महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी सांगून येत्या ८ दिवसात उमेदवारांची नावे जाहीर केले जातील असे कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले
कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित समाज महासंघाची बैठक झाली त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भंडारी समाजाचे जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर, सोनार समाज राज्य समन्वयक काका कुडाळकर, वैश्य समाज जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे, नामदेव समाजाचे व युवा अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नाभिक समाजाचे किशोर लाड, वैश्य समाजाचे बोर्डेकर, जिल्हा गावित समाजाचे संघटक रवीकिरण तोरसकर, वैश्य समाज पतसंस्थेचे संचालक ॲड. समीर वंजारी, जिल्हा तेली समाज कार्यकारणी सदस्य साईनाथ आंबेरकर, ओबीसी व आरक्षित समाजाचे महासचिव ॲड. नंदन वेंगुर्लेकर, गाबित समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पराडकर आदी उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी सांगितले की, आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहे पण लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे विधानसभा निवडणुका आहेत. आणि या निवडणुकीमध्ये ओबीसी व आरक्षित समाजाचे प्रतिबिंब दिसले पाहिजे म्हणून येत्या विधानसभांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही मतदार संघामध्ये ओबीसी व आरक्षित समाजाचे उमेदवार देण्यात येणार आहे याचे कारण असे आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेतील तरतुदी या किती महत्त्वाच्या आहेत हे आता ओबीसी समाजाच्या नेत्यांना समजून चुकले आहे. जे आर्थिक निकषावर आरक्षण मागण्यासाठी पुढाकार घेत होते त्यांना आता घटनेतील तरतुदीनुसार मिळालेल्या आरक्षणाचे महत्त्व समजले आहे असे सांगून ओबीसी व आरक्षित समाजाचा आतापर्यंत इतर समाजाने वापर करून घेतला आहे त्यामध्ये स्वतःचे अस्तित्व राखून ठेवून लाभाची पदे घेतली आणि निर्णय क्षमतेमध्ये आरक्षित समाजाला डावलले. पण आता या जिल्ह्यातील ओबीसी व आरक्षित समाज ही लढाई लढण्यासाठी सज्ज झाला आहे. जिल्ह्यामध्ये ७० टक्के समाज ओबीसी व आरक्षित आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत या समाजाचे उमेदवार रिंगणात उतरले जाणार आहेत तत्पूर्वी या संदर्भात प्रत्येक समाजाच्या महत्त्वाच्या लोकांशी चर्चा केली जाणार आहे आणि येत्या आठ दिवसात उमेदवार जाहीर केले जातील असे नितीन वाळके यांनी सांगितले.
