Saturday, July 12, 2025
Google search engine
Homeसिंधुदुर्ग जिल्हासावंतवाडीमहाविकास आघाडीत झाली बिघाडी ; अर्चना घारे- परब बंडखोरीच्या तयारीत ?

महाविकास आघाडीत झाली बिघाडी ; अर्चना घारे- परब बंडखोरीच्या तयारीत ?

सावंतवाडी | प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या महिला कोकण विभाग प्रमुख अर्चना घारे – परब यांनी अखेर बंडखोरी करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

तत्पूर्वी सावंतवाडी शहरातील वैश्य भवन मध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अर्चना घारे- परब यांनी व त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर त्यांनी आपला अर्ज दाखल केला.यावेळी त्यांच्या सोबत पक्षाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी,महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा निशिता नाईक, ॲड.नकुल पार्सेकर उपस्थित होते.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राजन तेली यांची अधिकृत उमेदवारी दोन दिवसांपूवीच जाहीर करण्यात आली आहे. हा मतदारसंघ (ऊबा ठा) सेनेच्या वाट्याला आला असून भाजपामधून सेनेत दाखल झालेले माजी आमदार राजन तेली यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे.याच मतदार संघातून अर्चना घारे- परब या निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या.परब या मूळच्या वेंगुर्ल्याच्या.मात्र त्यांचे कायम वास्तव्य पुण्यात.मात्र गेली दोन वर्षे त्यांनी जिल्ह्यात,सावंतवाडी मतदार संघात पक्ष कार्य जोमाने सुरू केले.हा मतदारसंघ पक्षाच्या वाट्याला यावा यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले.पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील,खासदार अमोल कोले यांनी त्यासाठी सावंतवाडीत सभा ही घेतली.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी त्या शिष्टमंडळही घेऊन गेल्या.मात्र बराच प्रयत्न करूनही हा मतदारसंघ ‘ऊबाठा ‘ सेनेच्या वाट्याला आला आणि तेली यांची उमेदवारी पक्षाने जाहीरही केली. अखेर उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या परब यांनी आपली ताकद दाखवण्यासाठी कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात मोठे शक्तिप्रदर्शन केले. आणि आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्जही दाखल केला. त्या बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

दरम्यान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.ही जागा आमच्या पक्षासाठी मिळावी यासाठी आमचे वरिष्ठ पातळीवर अजूनही प्रयत्न सुरू आहेत असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.वर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल.आघाडीचा धर्म आम्ही पळू असाही त्यांनी स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!