कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा झाली खडाजंगी

0

कुडाळ | प्रतिनिधी 

विधानसभा निवडणूकीनंतर घेण्यात आलेली कुडाळ नंगरपंचायतीची सर्वसाधारण सभा सभेत ठेवण्यात आलेल्या विविध विषयांवरून वादळी ठरली. नगरपंचायतीकडे खर्च करण्यासाठी निधीची कमतरता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे विविध विषयावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दीक खडाजंगी झाली. 

नाबरवाडी येथे गणेश घाट बांधणे व सुशोभिकरण करणे या कामास मुदतवाढ मिळावी. या विषयावर सभेत वाचन सुरु असताना गणेश भोगटे यांनी तेथील जागेसंदर्भात आक्षेप घेत प्रश्न उपस्थितीत करीत प्रशासनाला धारेवर धरले.त्यांनी प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जागेची छाननी केल्याशिवाय त्याठिकाणी काम करण्यात येऊ नये. तोपर्यंत त्या कामाला मुदत वाढ देण्यात यावी. शासनाची जागा असेल तर त्याठिकाणी निधी खर्च करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.

याच दरम्यान सत्ताधारी महाविकास आघाडी नगरसेविका श्रेया गवंडे व विरोधी नगरसेवक गणेश भोगटे यांच्यात वैयक्तीक टीका-टिप्पणी होऊन शाब्दीक खटका उडाला. त्यामुळे काहीसे वातावरण तंग बनले होते. नगरपंचायत सभागृहात गदारोळ झाला. दोघांमधील हा वाद सामंज्यशाने सोडविण्यात बाकीच्या नगरसेवकांना यश आले.त्यानंतर वातावरण शांत झाले.सुमारे चार तास ही सभा सुरु होती.

कुडाळ नगर पंचायतीची सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्याधिकारी अरविंद नातू, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक मंदार शिरसाट, उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे, सई काळप, ज्योती जळवी, भाजप गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक गणेश भोगटे, निलेश परब, ॲड राजीव कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी व कर्मचारी उपस्थितीत होते.

शहरातील ट्रस्टच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला नगर पंचायतीकडून आर्थिक मदत करण्यात यावी अशा विषयाचे सभेत वाचन सुरु असताना सत्ताधारी व विरोधकांमध्ये काहीशी शाब्दिक चकमक उडाली. तुमच्याकडे निधी उपलब्ध नाही. मग तुम्ही शहरातील प्रत्येक ट्रस्टला मदत कशी करणार आहात ? तुमच्याकडे भविष्यासाठी तरतुद आहे का? आमचा याला विरोध नाही. तसेच यापुढेही शहरातील प्रत्येक ट्रस्टला तुम्ही मदत करणार आहात का? असा सवाल विरोधकांनी केला. यावर महाविकास आघाडीचे नगरसेवक म्हणाले,शहरातील ट्रस्टच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मदत करण्यात यावी, असे आमचे स्पष्ट मत आहे. असे त्यांनी सांगितले. सफाई कर्मचारी वेतनात वाढ होणे आवश्यक आहे असा ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आला. स्मशानभूमीच्या ठिकाणी झाडी वाढली आहे. त्याठिकाणी असलेले साहित्य विस्कटीत झाले आहे. त्याठिकाणी नियोजन होणे आवश्यक आहे असे चांदणी कांबळी यांनी सांगितले. हॉटेल अभिमन्यू ते काळपनाका रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.असे सर्वानुमते ठरविण्यात आले. शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात ठिकठिकाणी कचरा डेपो तयार होत आहेत. शहरात लोक कुठेही कचरा टाकीत आहेत. कचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.तसेच कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचा मोबाईलमध्ये फोटो काढून नगरपंचायतीकडे दिल्यास फोटो देणाऱ्या व्यक्तीला न. पं. तीकडून पारितोषिक देण्यात येणार आहे, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला त्याला सर्वानी अनुमती दर्शविली. शहरातील रस्त्याची साफसफाई करण्यासाठी ग्रासकटर मशीनचा वापर केला जातो.त्यासाठी नं. पं. तीला जास्त खर्च येतो. असे नातू यांनी सांगितले. कुठच्या वॉर्डमध्ये ग्रास कटर मशीनचा जास्त वापर करण्यात येतो त्याची दाखवा? असा सवाल विलास कुडाळकर यांनी केला. यावेळी सत्ताधारी व विरोधकांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर उपनगराध्यक्ष किरण शिंदे म्हणाले दिवाळी, गणेश चतुर्थी आदी सणाला ग्रासकटरचा वापर करण्यात यावा. वॉर्डमध्ये इतरवेळी ग्रासकटर मशीनचा वापर करण्यात आला तर त्याचा खर्च नगरपंचायत देणार नाही. असा ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आला. प्रत्येकाने आपला वॉर्ड स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, असे उदय मांजरेकर यांनी सांगितले. कॅबिनेट मंत्री नितेश राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कुडाळ- मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या अभिनंदन ठराव घेण्यात आला. तबलावादक जाकीर हुसेन यांना आदरांजली ठराव घेण्यात आला.