कुडाळ पंचायत समिती येथे ३० डिसेंबर रोजी प्राथमिक शिक्षक समितीचे होणार आंदोलन

0

प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष शशांक आटक यांची कुडाळ येथे पत्रकार परिषदेत माहिती

कुडाळ | प्रतिनिधी

एक राज्य एक गणवेश योजनेच्या असंख्य त्रुटी, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतील ऑनलाईन कामातील त्रुटी,नवीन संचमान्यता धोरणाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना बसणारा फटका, अशा ज्वलंत प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळ आक्रमक होत शासन प्रशासनाला जाग येण्यासाठी ३० डिसेंबर रोजी पं.स.कुडाळ समोर तीव्र धरणे आंदोलन करणार असल्याचे तालुकाध्यक्ष शशांक आटक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी शिक्षक समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर,राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेव जांभवडेकर व सचिन मदने,माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे,सचिव महेश गावडे, कायदेशीर सल्लागार संतोष वारंग, संघटक स्वामी सावंत, शिक्षक नेते प्रसाद वारंग आदी उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षकांच्या अनेकविध समस्या आणि त्या समस्या सोडविण्यासाठी अनेक आंदोलने राज्यभर होत असतात. दि.३० डिसेंबर रोजी येणा-या नवीन वर्षात तरी विद्यार्थ्यांशी संबंधित समस्या प्रशासन व शासन स्तरावर सुटतील या आशेनेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळच्यावतीने फक्त विद्यार्थी व शाळा यांचेच प्रश्न घेऊन हे एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करीत आहोत. बालकाचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम २००९ व भारतीय संविधानातील बालकाच्या शिक्षणाच्या मुलभूत हक्काचा अनुच्छेद २१ अ याचा वारंवार होणारा भंग संघटनेला न पटल्याने हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष शशांक आटक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.