बनावट चेक व खोट्या ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून साहित्य घेऊन आरोपी फरार; कुडाळ पोलिसांत तक्रार
कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ गणेशनगर येथे इलेक्ट्रिकल साईट सुरू असल्याचे भासवून आणि मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल फिटींग साहित्याची गरज असल्याचे सांगून कुडाळ तालुक्यातील तीन इलेक्ट्रिकल व्यावसायिकांची तब्बल ३ लाख ४२ हजार ६२४ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विश्रुत भालचंद्र नवाथे (वय ४२, रा. १०१, कमल हाऊसिंग सोसायटी, एस. एन. १०/८/१, सनसिटी रोड, वडगाव बुद्रुक, आनंदनगर, पुणे) याच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत नम्रता रामदास परब (वय ३३, रा. हुमरमळा, वालावल, ता. कुडाळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या सिमावाडी, पावशी येथील साई प्रोजेक्ट्स अँड इंजिनिअर्स प्रा. लि. या कंपनीत अकाऊंटंट म्हणून कार्यरत असून त्या मे. सावंत इंटरप्रायझेस या संस्थेचेही अकाऊंट, बिलिंग, सेल्स, बँक व्यवहार, सप्लायर पेमेंट, पर्चेस ऑर्डर आदी आर्थिक व्यवहार सांभाळतात. फिर्यादीनुसार, ४ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता विश्रुत नवाथे याने फोन करून गणेशनगर येथील त्याच्या साईटसाठी कॉपर वायर, अर्थिंग वायर व इतर इलेक्ट्रिकल साहित्याची चौकशी केली. त्यानंतर त्याने आवश्यक साहित्याची यादी मोबाईलवर पाठवून कोटेशन मागविले. फिर्यादीने ५ जुलै रोजी ई-मेलद्वारे कोटेशन पाठविले.
त्यानंतर ७ जुलै रोजी आरोपी प्रत्यक्ष दुकानात आला. त्याने आणखी इलेक्ट्रिकल फिटींग साहित्याची यादी दिली, सिलिंग फॅनबाबत चौकशी केली आणि सर्व साहित्य उपलब्ध झाल्यानंतर तातडीने पुरवठा करण्याची विनंती केली. ८ जुलै रोजी त्याने आणखी एका यादीचा टेक्स्ट मेसेज पाठविला, त्यानुसार ९ जुलै रोजी दुसरे कोटेशन पाठविण्यात आले.
११ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजता आरोपी रिक्षा घेऊन दुकानात आला. त्याच्या मागणीनुसार सर्व इलेक्ट्रिकल साहित्य रिक्षामध्ये भरून देण्यात आले. त्यावेळी अविनाश पुरुषोत्तम नवाथे यांच्या नावाने बिल करण्यात आले असून एकूण १,३५,९३३ रुपयांचे बिल झाले. फिर्यादीने रोख किंवा तत्काळ पेमेंटची मागणी केली असता आरोपीने एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँकेचा खाते क्रमांक ११३१००१०००००६१८ व चेक क्रमांक ००३०७३ असलेला १,३५,९३३ रुपयांचा चेक दिला. चेक स्वीकारण्याबाबत शंका व्यक्त केली असता, आरोपीने त्याची गणेशनगर येथे साईट सुरू असल्याचे सांगून चेक निश्चित वटेल, असे आश्वासन दिले. त्यामुळे विश्वास ठेवून त्याला माल देण्यात आला. १५ जुलै रोजी हा चेक सारस्वत बँक, कुडाळ शाखेत भरल्यानंतर संबंधित खातेदाराने पेमेंट स्टॉप केल्याचे बँकेकडून कळविण्यात आले. त्यानंतर फिर्यादीने आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल क्रमांक सतत बंद येत होता.
या घटनेची माहिती फिर्यादीने ओळखीच्या व्यावसायिकांना दिल्यानंतर आणखी दोन फसवणुकीचे प्रकार समोर आले. आदिनारायण इलेक्ट्रिकल्स, एस.टी. स्टँडसमोर, कुडाळ येथून आरोपीने १३ जुलै २०२६ रोजी ४१,६०० रुपयांचे इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केले. त्या बदल्यात दिलेल्या चेकचेही पेमेंट स्टॉप करण्यात आले. तसेच के. वाय. इलेक्ट्रिकल्स, पिंगुळी येथून २३ जुलै २०२६ रोजी १,६५,०९१ रुपयांचे साहित्य खरेदी करून ऑनलाइन रक्कम ट्रान्सफर झाल्याचा बनावट मेसेज दाखवून माल घेऊन गेला. प्रत्यक्षात संबंधित व्यावसायिकांच्या खात्यात कोणतीही रक्कम जमा झाली नव्हती. आरोपीने गणेशनगर येथे इलेक्ट्रिकल साईट सुरू असल्याचे सांगून आणि तातडीने साहित्याची आवश्यकता असल्याचे भासवून तीन व्यावसायिकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सावंत इंटरप्रायझेसचे १,३५,९३३ रुपये, आदिनारायण इलेक्ट्रिकल्सचे ४१,६०० रुपये आणि के. वाय. इलेक्ट्रिकल्सचे १,६५,०९१ रुपये, असे एकूण ३,४२,६२४ रुपयांचे इलेक्ट्रिकल फिटींग साहित्य घेऊन त्याची रक्कम न देता फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी विश्रुत भालचंद्र नवाथे याच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 318(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फसवणुकीच्या या प्रकाराचा अधिक तपास करीत आहेत. बनावट चेक, पेमेंट स्टॉप आणि खोट्या ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून इतर व्यावसायिकांनाही फसवण्यात आले आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.


