कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यावर शहरातील शिवप्रेमींनी शिवाजी नगर ला छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर करण्याची मागणी केली होती मात्र तीन वर्षात ही मागणी पूर्णत्वास गेली नव्हती सत्तांतर झाल्यानंतर महायुतीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर शिवाजीनगरला करण्यात आले याबद्दल महायुतीचे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर यांच्यासह नगरसेवकांचे शिवप्रेंमीनी आभार मानले.
कुडाळ शहरातील शिवप्रेमींनी तीन वर्षांपूर्वी शहरातील शिवाजी नगरला छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर करावे अशी मागणी केली होती. मात्र शिवप्रेमींचे हे पत्र सभागृहासमोर आणले गेले नाही. दरम्यान विवेक पंडित व रमा नाईक यांनीही बाब महायुतीचे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतरची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. या सभेच्या विषय पटलावर गटनेता विलास कुडाळकर यांनी शिवप्रेमी व आमची मागणी आहे की, शिवाजी नगरला छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर करावे हा विषय ठेवला होता. या विषयाच्या अनुषंगाने महायुतीच्या सात नगरसेवकांनी त्याला संमती देऊन शिवाजी नगरला छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतरित केले. हा ठराव झाल्याचे शिवप्रेमी यांना समजल्यावर त्यांनी आज (शनिवारी) नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची भेट घेतली आणि यावेळी उपस्थित असलेले गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. तसेच महायुतीच्या सर्व नगरसेवकांचे आभार मानले. यावेळी विवेक पंडित, भावना केळकर, प्रख्यात काणेकर, अमोल निकम, उदय आईर, पांचाळ (बंधू), श्रीकृष्ण शिरोडकर, अभिषेक रेगे, विघ्नेश दाभोलकर, जगदीश भोसले, रूपेश मोरे, विकास पटवर्धन आणि रमाकांत नाईक उपस्थित होते.
