कुडाळ नगरपंचायत हद्दीतील थकीत मालमत्ता धारकांना दणका 

0

 

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कुडाळ नगरपंचायतीचा मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी रोजी २२ मालमत्ता सील करण्याची कारवाई नगरपंचायत प्रशासनाने केली आहे. दरम्यान मार्च अखेरची धावपळ सुरु असल्याने न. पं. च्या कर वसुलीच्या मोहिमेने वेग घेतला आहे.  

कुडाळ न. पं. मध्ये मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर थकविल्याने त्यांच्या मालमत्ता सील करून नगरपंचायतीमार्फत जप्तीची कारवाई मोहीम सुरु आहे. ५ हजारहून अधिकचा कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांना मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यापैकी कर न भरल्यास मालमत्ता जप्त केल्या जातील, असा इशारा देत थकीत कर भरणा करावा, असे आवाहन प्रशासनाने मुनादीद्वारे केले होते. दरम्यान, थकीत मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी न. पं. ने जप्ती पथक तैनात केले असून, या पथकामार्फत गेले २ दिवस शहरात कारवाईची मोहीम सुरु आहे. ही कारवाई कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी राजू पठाण व जप्ती पथक प्रमुख लिपिक दत्ताराम उर्फ निलेश म्हाडेश्वर, वसुली कर्मचारी मंदार सावंत, शैलेश नेवाळकर, वैष्णवी पेडणेकर, केतन पवार, प्रविण कोरगावकर, रोहित परब, संदेश कुंभार यांच्या पथकाने केली.  

ही कारवाई अशीच सुरुच राहणार असून, कुडाळ न.पं. हद्दीतील थकीत मालमत्ताधारकांना थकीत व चालू आर्थिक वर्षाचे मालमत्ता कर भरण्याचे अवाहन करण्यात येत आहे.