डबलबारी भजनाचे नवे नियम पाळण्याचा निर्धार

0

 

कणकवली | प्रतिनिधी 

सिंधू रत्न सांगीत भजनोत्कर्ष मंडळ, सिंधुदुर्ग ने शनिवारी कणकवली येथे बोलाविलेल्या भजनी बुवा व भजनी कलाकार तसेच भजनीश्रोते यांच्या बैठकीत भजनाच्या डबलबारीचे नवे नियम तंतोतंत पाळण्याचा निर्धार करण्यात आला.या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.

कणकवली येथील भालचंद्र महाराज मठाच्या सभागृहात ही बैठक झाली. बैठकीचे अध्यक्षस्थानी सिंधू रत्न भजन उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष भजनी बुवा श्री भालचंद्र केळुस्कर उपस्थित होते. या बैठकीला कणकवली तालुका सांप्रदायिक भजन मंडळाचे अध्यक्ष भजनी बुवा प्रकाश पारकर यांनी बैठकी मागचा उद्देश सांगितला. बुवा शशी राणे, गोपीनाथ लाड, सुदर्शन फोपे, पत्रकार गणेश जेठे, मारुती मेस्त्री, हेमंत तवटे ,सौ योगिता परब, मयूर ठाकूर, चंद्रशेखर चव्हाण, श्रीकांत शिरसाट, रवींद्र कदम, राज वर्देकर, ज्ञानदेव मेस्त्री, चंद्रकांत गुरव, नामदेव गिरकर,जनार्दन सावंत,दत्ताराम मेस्त्री, संजय ठाकूर, आनंद मेस्त्री, विकास गुरव, सखाराम येंडे,गणेश मेस्त्री, किशोर सुतार,गौरव लाड ,पंढरी जाधव,

 संजय येंडे,प्रकाश पवार, अथर्व पवार,शंकर राणेआदी उपस्थित होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.हेमंत तवटे यांनी डबलबारी भजनाचे नवे नियम वाचून दाखवले. हे नियम ओरोस येथील रवळनाथ मंदिरात झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत ठरविण्यात आले.

महिला व पुरुष भजनी बुवा यांच्यामध्ये पुढील एक वर्षांसाठी डबलबारी भजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. डबलबारी भजनातील बुवांनी एकमेकांना अरे तुरेची भाषा करू नये.भजन करताना बुवाने मद्य प्राशन करू नये,तसेच भजनामध्ये वादकानेही मध्य प्राशन करू नये. तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. पूर्वीच्या डबलबारी प्रमाणे हिंदू धर्म संस्कृती टिकवून भजन करण्यात यावे. गॉगल लावून हातवारे करून तलवारी काढून विक्षिप्त हावभाव करून भजन करू नये. एकाबुवाची बारी चालू असताना दुसऱ्या बुवाने मध्ये बोलू नये. युट्यूबर ने परवानगी घेऊनच व्हिडिओ करावा, भडकाऊ कॅप्शन देऊ नये. भजनाचा आर्केस्ट्रा होऊ देऊ नये,गजरामध्ये फर्माईश शिवाय इतर गाणी गाऊ नये. वेळेच्या बंधनानुसार सर्व फेऱ्या पूर्ण करणे. रूपावळ पर्यंत सलग भजन करावे, गजर स्वतंत्र असावा. एका गजराला 35 ते 40 मिनिटे इतकाच वेळ घ्यावा. हे सर्व नियम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलाकारांना लागू आहेत. हे नियम जो पायदळी तुटवेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.जे कलाकार या नियमांचे पालन करतील त्याच भजनी कलाकारांना भविष्यात कलाकार मानधन देण्याबाबतचा शिफारस दिली जाईल.जे नियम मिळतील अशांना कलाकार मानधन देऊ नये, अशी मागणी शासन केली जाईल,असा इशाराही या बैठकीत देण्यात आला आहे .

या सर्व नियमांचे पालन करण्याचा निर्णय कणकवलीतील बैठकीत घेण्यात आला .त्याशिवाय गावोगावी ची भजन मंडळे आहेत, त्यातील बुवा, मृदुंगवादक,ताल रक्षक, कोरस या सर्वांची माहिती घेण्याचा निर्णय घेणेत आला. त्यानुसार प्रत्येक भजनी कलाकाराकडे फॉर्म देण्यात आले.ही माहिती भरलेले फॉर्मची एक प्रत संबंधित भजनी कलाकाराकडे , दुसरी प्रत तालुक्याच्या मंडळाकडे आणि तिसरी प्रत जिल्ह्याच्या मंडळाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 सुरुवातीला प्रास्ताविक बुवा प्रकाश पारकर यांनी केले .यावेळी बुवा भालचंद्र केळुसकर यांनी मार्गदर्शन केले. त्याशिवाय इतर भजनी कलाकारांनी आपली मते व्यक्त केली.शेवटी प्रकाश पारकर यांनी आभार मानले.